गडहिंग्लजमधील स्पर्धेत नैसर्गिक रंगांनी सजल्या बैलजोड्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

गडहिंग्लज - बेंदूर सण आणि सदृढ बैलजोडीच्या स्पर्धा म्हटल्या की तेलातील हुरमूंज आलाच. दरवर्षीचे हे चित्र. परंतु, यंदा शिवाजी चौक मित्र मंडळाने हुरमूंजाला फाटा देत नैसर्गिक आणि कोरड्या रंगात रंगवलेल्या बैलजोड्या स्पर्धेत सहभागी करण्याचे आवाहन केले होते.

गडहिंग्लज - बेंदूर सण आणि सदृढ बैलजोडीच्या स्पर्धा म्हटल्या की तेलातील हुरमूंज आलाच. दरवर्षीचे हे चित्र. परंतु, यंदा शिवाजी चौक मित्र मंडळाने हुरमूंजाला फाटा देत नैसर्गिक आणि कोरड्या रंगात रंगवलेल्या बैलजोड्या स्पर्धेत सहभागी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद देत पशूपालकांनी आपल्या बैलांना नैसर्गिक रंगासह गुलालाने न्हाऊ घातले. पी...ढबाक, बेंजोच्या निनादात आणि हलगीच्या कडकडाटात निघालेल्या बैलजोड्यांच्या जल्लोषी मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. 

दरवर्षी तेलातील हुरमूंजामुळे बैलांसह स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या शौकीन आणि स्पर्धकांच्या समर्थकांनाही त्रास होत असे. यामुळे यंदा संयोजक शिवाजी चौक मित्र मंडळाने हुरमूंजाचा वापर करणाऱ्या बैलजोड्या स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे स्पर्धक पशूपालकांनी आपल्या बैलांना आज कोरड्या आणि नैसर्गिक रंगात सजवले. शिंगांना गोंडे, आकर्षक रंगाचा कासरा आणि रंगाने न्हाऊन निघालेल्या बैलजोड्यांनी शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बेंजो, पी...ढबाकचा निनाद आणि हलगीचा कडकडाट यामुळे मिरवणुकांमध्ये जल्लोष भरला होता. स्पर्धक पशूपालकांच्या कुटूंबातील चिमुकल्यांचे मिरवणुकीतील नृत्य लक्षवेधी ठरत होते. 

मुख्य मार्गावरून बाजारपेठ, नेहरू चौक पासून शिवाजी चौकातील स्पर्धा स्थळी मिरवणुकीने बैलजोड्या येत होत्या. वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि बसवेश्‍वर महाराजांच्या जयघोषात निघालेल्या मिरवणुका आकर्षणाच्या ठरल्या. दाती, बिनदाती आणि बैलजोडी गटातील बैलजोड्यांचा डामडौल पाहण्यासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह सीमाभागातील शेतकरी, शौकीनांनी शिवाजी चौक, नेहरू चौक, बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.

शिवाजी चौकातील स्पर्धा स्थळी गटनिहाय बैलजोड्यांचे परीक्षण सुरू होते. दरम्यान, जुलै महिना आला की गडहिंग्लजच्या सदृढ बैलजोड्यांच्या स्पर्धांचे वेध लागतात. दीड लाखाहून अधिक रक्कमेची रोख बक्षीसे असलेल्या या स्पर्धा या भागातील सर्वात मोठ्या स्पर्धा मानल्या जातात. दाती, बिनदाती आणि बैलजोडी अशा तीन गटात या स्पर्धा होतात. तीसहून अधिक बैलजोड्या यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. 
 
नगरपालिकेतर्फे स्वागत... 
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलजोडीचे स्वागत नगरपालिकेतर्फे या वर्षीही करण्यात आले. नेहरू चौकात खास मंडप उभारले होते. याठिकाणी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष सुनिता पाटील यांच्यासह नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते बैलजोडी मालकांना श्रीफळ, फेटा, कासरा असे साहित्य भेट देण्यात येत होते. शिवाजी चौकात जाण्यापूर्वी नेहरू चौकातील या स्वागताच्या कार्यक्रमाने बैलजोडी मालकांना प्रोत्साहन मिळत होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy bull competition in Gadhinglaj