पावसाने दाणादाण; रस्त्यांची "वाट'; सांगली महापालिकेच्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे

जयसिंग कुंभार
Thursday, 15 October 2020

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सांगली शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे.

सांगली : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. तसेच बुधवारी दिवसभर धो-धो पडणाऱ्या पावसाने शहरात पुरसदृश्‍य स्थिती दिसत आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. त्यानिमित्ताने ठेकेदारांनी बनवाबनवी करुन केलेल्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. कोरोना महामारीत यंत्रणा गुंतल्याचा आव आणला जात असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे. 

काही दिवसांपूर्वी केलेला राममंदिर कॉर्नर ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता पुन्हा "जैसे थे' बनला आहे. सतत वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावरुन वाहनांची खड्ड्यातूनच ये-जा सुरु आहे. त्याचप्रमाणे मध्यवर्ती एस. टी. बसस्थानकाशेजारील झुलेलाल चौकातही रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने वाहनचालकांची फसगत होते. खड्डयांचा अंदाज न आल्याने अनेकदा दुचाकी गाड्या घसरुन अपघात झाले आहेत.

महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची फसगत होत असल्याचे चित्र काही नवीन नाही. शंभरफुटी रस्ता, बायपास रोड, कोल्हापूर रस्ता, सांगली-मिरज रस्ता, सांगली-माधवनगर रोडसह अंतर्गत रस्ते पावसाच्या पाण्याने खराब झाले आहेत. त्याचप्रमाणे उपनगरात विविध निधीतून केलेल्या रस्ता कामांचेही तीनतेरा वाजले आहेत. अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या मार्केट यार्ड परिसरातही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. 

गतवर्षी महापुराच्या दणक्‍याने रस्त्यांची केलेली कामे धुवून गेली होती. सराफ पेठ, कापड पेठ, पटेल चौक, बालाजी मंदिर परिसर, हरभट रोड, गावभाग, स्टॅंड परिसर, आंबेडकर रोड, खणभाग, वखारभागातील रस्त्यांवर पाणीच पाणी होते. त्यामुळे साहजिकच तेथे रस्त्यांची कामे पुन्हा नव्याने करावी लागली. यंदा पावसाने जुलै महिन्यांपासून जोरदार हजेरी लावली होती. मध्यंतरी काही दिवस उसंत घेतल्यानंतर पावसाने पुन्हा गेल्या चार दिवसांपासून मुसळधार वृष्टी केल्याने रस्त्यांची निकृष्ट कामे उघडी पडली. 

शेरीनाला पुन्हा कृष्णेत... 
संततधार पावसामुळे सखल भागातून येणारे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. शेरीनाला पूर्ण भरल्याने साठलेले पाणी नदीत जात असल्यामुळे पाण्याचा रंगही बदलत आहे. शहरातील विविध भागात साठलेले दूषित पाणी शेरीनाल्यातून थेट नदीत जात आहे. गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढतच असून शेरीनाल्यातील दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे नेहमी फेसाळत असणारा हा नाला पावसाच्या पाण्याने मात्र ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In heavy rain damaged roads in Sangali city