सातारा जिल्ह्यातील २२ गावांना हवी मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड आणि सातारा तालुक्‍यांतील गावे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. या गावातील लोकांना आता आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. औषधे, कपडे, शुध्द पाणी, धान्ये, सुके अन्न या स्वरूपातील मदत प्राधान्याने या २२ गावांपर्यंत देणे गरजेचे आहे.

कऱ्हाड, पाटण, सातारा तालुक्‍यांतील गावे
सातारा - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड आणि सातारा तालुक्‍यांतील गावे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. या गावातील लोकांना आता आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. औषधे, कपडे, शुध्द पाणी, धान्ये, सुके अन्न या स्वरूपातील मदत प्राधान्याने या २२ गावांपर्यंत देणे गरजेचे आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरसोबतच सातारा जिल्ह्यातील या बाधित २२ गावांतील लोकांना तातडीने मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

दोन आठवडे झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणी नियंत्रित करताना सोडलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये पाटण, कऱ्हाड आणि सातारा तालुक्‍यांतील गावे पाण्याखाली गेली. सातारा जिल्ह्यासोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक मदत ही सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला आहे. पण, त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील पुराने बाधित २२ गावांना अद्याप पुरेशी मत मिळालेली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी मदत पाठविताना सातारा जिल्ह्यातील २२ गावांना कशा पध्दतीने मदत देता येईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. 

तालुकानिहाय सर्वाधिक बाधित गावे अशी -
कऱ्हाड तालुका -
 कऱ्हाड शहर, तांबवे, खुबी, रेठरे, शेरे, म्हापरे, मालखेड, सुपने.
पाटण तालुका - पाटण शहर, शिरळ, हेळवाक, जामदाडवाडी, बनपेटवाडी, नावडी, दरड कोसळलेल्यामध्ये मजगुडेवाडी, भाटेवाडी, चिमणवाडी यांचा समावेश आहे.

सातारा तालुक्‍यातील टोळेवाडी, बेंडवाडी, भैरवगड, मोरेवाडी या गावांचा समावेश आहे.

या गावांतील ग्रामस्थांना प्राधान्याने औषधे, कपडे, शुध्द पाणी, सुके अन्नपदार्थ, इतर धान्ये, कडधान्ये, भांडी यांचा समावेश आहे. 

कऱ्हाड, सातारा व पाटण तालुक्‍यांतील या गावांना मदत करताना त्या-त्या तालुक्‍यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष आणि तहसीलदारांशी संपर्क करून ही मदत पाठवावी. त्यामुळे ग्रामस्थांना गरजेची मदत ज्या त्या ठिकाणी देता येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मदतीचे वाटप झाल्यास सर्वांना योग्य प्रकारे मदत मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Flood 22 Village Help Demand in Satara District