esakal | सांगलीत मुसळधार; शहरात साचले तळे
sakal

बोलून बातमी शोधा

Rain News

सांगलीत मुसळधार; शहरात साचले तळे

sakal_logo
By
राहुल शेळके

सांगली : शहरात सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळायला सुरवात झाली. साडेपाचला पाऊस सुरु झाला. तो अखंड तासभर सुरु होता. शहरात पाणी-पाणी झाले. गुंठेवारी भागात तासाभरात महापूरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश चौकात पाणी साचले. वाहतूक खोळंबली. संपूर्ण शहर या काळात थांबले. अगदी चारचाकी वाहनातून प्रवास करणेही कठीण होईल, इतका जोराचा पाऊस झाला.

दिवसभर स्वच्छ वातावरण होते. पावसाचा लवलेशही नव्हता. पाच वाजता ढग दाटून यायला लागले. साडेसहाला पाऊस सुरु झाला. त्याचा वेग इतका मोठा होता की अर्धा तासात सगळ्या शहरांत पाणी पाणी झाले. श्‍यामरावनगरसह शहरातील संपूर्ण विस्तारीत भाग पाण्यात गेला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. कोल्हापूर रस्त्यावरील वस्त्या, विजयनगर परिसरात अक्षरशः पाणी-पाणी झाले. मारुती चौक, स्टेशन रोड, राम मंदीर, सिव्हिल चौक येथे तर पाण्याचे मोठे प्रवाह वाहत होते. पेठांत रस्त्यावर व्यापार करणाऱ्यांची तारांबळ उडाली.

हेही वाचा: आर्यन खानला एनसीबीकडून अटक, कोर्टात हजर करणार

शहरातील ड्रेनेज व्यवस्थेच्या मर्यादा उघड्या पाडणारा हा पाऊस पडला. गेल्या काही काळातील हा सर्वात मुसळधार पाऊस असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले. मोठमोठ्या सरी सलग कोसळत राहिल्याने रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले. चौकातून दुकानांत पाणी गेले. तळ मजल्यावरील अनेक दुकानांत पाणी शिरले.

loading image
go to top