खटाव, माण तालुक्‍यास पावसाने झोडपले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

सातारा - खटाव, माण, खंडाळा, वाई या तालुक्‍यांना गुरुवारी (ता. 31) विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे काही घरांचे पत्रे उडाले तर भिंतीही ढासळल्या. या पावसामुळे खरीपपूर्व मशागतींना वेग येणार आहे. 

सातारा - खटाव, माण, खंडाळा, वाई या तालुक्‍यांना गुरुवारी (ता. 31) विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे काही घरांचे पत्रे उडाले तर भिंतीही ढासळल्या. या पावसामुळे खरीपपूर्व मशागतींना वेग येणार आहे. 

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता खटावसह तालुक्‍याच्या उत्तर भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. दुपारपासूनच विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहत होते. पाच वाजता काही काळ गारांचा पाऊस झाला. तासभर पडलेल्या पावसामुळे खटाव परिसरातील शेतांमध्ये पाणी साठले. काही ठिकाणी ताली फुटल्या, तर ओढे आणि नाल्यांमधून पहिल्यांदाच पाणी वाहिले. खटावमधील मनोहर वायदंडे आणि लता तुपे यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आणि भिंतीही ढासळल्या. तालुक्‍याच्या उत्तर भागातील खातगुण, भांडेवाडी, निढळ, जाखणगाव, ललगुण भागालाही या पावसाने झोडपून काढले. शेतात काढून पडलेल्या, तसेच ऐरणीत साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. जाखणगावात वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला.

माण तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील प्राथमिक शाळेवरील पत्रा जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्याने नुकसान झाले. मलवडी, भांडवली, तेलदरा, सत्रेवाडी, परकंदी, टाकेवाडी, शिंदी खुर्द, कळसकरवाडी या परिसरातील शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. यंदा या परिसरात फक्त वादळी वारे वाहत होते. वळीव मात्र हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काही वेळ पडलेल्या संततधार पावसामुळे या परिसरात उन्हाळ्यात केलेली जलसंधारणाची कामे पाण्याने भरून गेली. सलग समतल चर, खोल सलग समतल चर, बांध बंदिस्ती, अनघड दगडी बांध, छोटे माती नालबांध भरून वाहिले. काही ठिकाणी ओढ्यांना पाणी आले. तेलदरा येथील ओढ्यातून आलेल्या पाण्यामुळे मलवडीतील सार्वजनिक विहिरी जवळील माणगंगा नदीवरील सिमेंट बंधारा निम्मा भरला. खंडाळा तालुक्‍यातील लोणंद परिसरात वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस झाला आहे. वाई तालुक्‍यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. 

Web Title: heavy rain in maan khatav taluka