परतीच्या पावसाने भातशेती पाण्यात ; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

सतीश जाधव
Wednesday, 14 October 2020

बेळगाव शहरासह तालुक्‍यात गेले काही दिवस परतीचा पाऊस होत आहे. मात्र,

बेळगाव : परतीच्या पावसाचे धुमशान सुरूच राहिले असून शहर आणि तालुक्‍यात जोरदार पडत आहे. यामुळे बेळगावकर हैराण झाले आहेत. शहरात बुधवारी (ता.14) सकाळी 11 च्या दरम्यान तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. बेळगाव जिल्ह्यात ऑक्‍टोंबर महिन्यात सरासरी 110.45 मिमी पाऊस पडतो. अवघ्या 14 दिवसात 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे.

 

बेळगाव शहरासह तालुक्‍यात गेले काही दिवस परतीचा पाऊस होत आहे. मात्र, बुधवारी तासभर कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात ऑक्‍टोंबर महिन्यात 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. 11 पासून पावसाने पुन्हा जोर धरला असून आतपर्यंत पाऊस होतच आहे. 11 रोजी जिल्ह्यात 30 मिमी, 12 रोजी 26.7 मिमी, 13 रोजी 10. 5 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारीही जोरदार पाऊस सुरुच होता.

बुधवारी सकाळीच जोरदार झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी जमा झाले होते. शिवबसवनगरात रस्त्यावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांनाही अडचणी आल्या. तसेच भात शेतीमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान होत आहे. पाऊस होत असल्याने तयार झालेली भात शेती आडवी होत आहे. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात पश्‍चिम भागात अतिवृष्टी : शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज, सर्तकतेचा इशारा -

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी राकसकोप व हिडकल दोन्ही जलाशये ऑगस्टपासून तुंडूंबच आहेत. राकसकोप जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता 2477.00 आहे. सध्या जलाशयात 2475.65 फुट इतका पाणी साठा आहे. जलाशयाला सहा दरवाजे असून सर्व दरवाजे सध्या बंदच आहेत. जलाशय आवारात बुधवारी 5.8 मिमी पाऊस झाला. गतवर्षी 14 ऑक्‍टोंबरला पाणी पातळी 2435.8 फूट इतकी होती. तर 3807.3 मिमी पाऊस झाला होता. हिडकल जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता 51 टीएमसी आहे. सध्या जलाशय पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. जलाशय आवारात आतापर्यंत 847 मिमी पाऊस झाला. जलाशयात 2840 क्‍सूसेस इनफ्लो तर इतकाच विसर्ग आहे. गतवर्षीही 14 ऑक्‍टोंबरला जलाशय पुर्ण क्षमतेने भरले होते. गतवर्षी 1052 मिमी पाऊस झाला. 2669 क्‍सूसेस इनफ्लो तर इतकात विसर्ग होता. 

 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall belgaum impact for rice farming