स्मार्ट सोलापूरकरांनी काय केला ओव्हरस्मार्टपणा 

Helmet
Helmet

सोलापूर : सध्या सोलापुरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटची कारवाई सुरू आहे. शहरातील अपघातांमध्ये जीवित हानी होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई सुरू आहे, तरी शहरातील जवळपास 90 टक्के दुचाकीस्वारांच्या शिरावर शिरस्त्राण दिसतच नाही. कारवाईची भीतीच राहिली नाही का, असा प्रश्‍न पडण्याचे कारणही नाही. कारण, स्मार्ट सोलापूरकरांच्या ओव्हरस्मार्टपणामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार शहरात बिनदिक्कत फिरत असल्याचे समोर येत आहे. 
सोशल मीडियावर रोज भन्नाट विनोदी किस्से, टिक-टॉक व्हिडिओ अपलोड करून ग्रुप हसता ठेवण्याचा प्रयत्न नेटकरी करत असतात. कोणाच्या टाळक्‍यात कधी कुठली भन्नाट कल्पना येईल, याचा नेम नाही, हे व्हॉट्‌सऍप ग्रुपवर दिवसभर नजर टाकल्यास दिसून येईल. आता तर व्हॉट्‌सऍप ग्रुपवर ग्रुप मेंबरना "अलर्ट' करणारे मेसेज फिरत आहेत; तेही ".... या ठिकाणी वाहतूक पोलिसांची जोरदार कारवाई सुरू आहे. त्या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी एकतर हेल्मेट घालून जावे किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, ही विनंती...' असे मेसेज दररोज ग्रुपवरून फिरत असल्याने, संबंधित माहिती देणाऱ्या ग्रुप मेंबरचे खूप मोठ्या कारवाईपासून वाचविल्याच्या भावनेतून "थॅंक यू' म्हणत ऋणही व्यक्त केले जात आहेत. 

हेही वाचा : युवती म्हणते, माझ्या होणाऱ्या बाळाचे चार बाबा... 
कारवाई होत असल्याचे मेसेज 

पूर्वभागातील हद्दवाढ भागात जसे जुने विडी घरकुल, नवीन विडी घरकुल, नीलमनगर आदी परिसरातील रिक्षा ओव्हरलोड प्रवासी घेऊन बिनदिक्कत फिरत असतात. त्यांच्यावर कधीतरी कारवाई सुरू होताच रिक्षाचालकांचा ग्रुप या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्या रिक्षाचालकांना इशारा देत कारवाई होत असल्याचे मेसेज देतात. त्यामुळे अनेक रिक्षाचालक कारवाईतून सहीसलामत सुटतात. आता तर दुचाकी वाहनचालकांवर हेल्मेट सक्तीची कारवाई होत असल्याने सोशल मीडियावर सगळेच सावधान झाले आहेत. मग कुठे कारवाई सुरू असल्यास तत्परतेने ग्रुपमधील सभासद आपल्या ग्रुपवर कारवाई होत असल्याचे इशारे देत असल्याचे रोजच पाहावयास मिळत आहे. 
पोलिसांच्या या कारवाईबाबत काही ग्रुपवर "गुड मॉर्निंगचा मेसेज करण्यापेक्षा पोलिसांची हेल्मेटविरोधी कारवाई कुठे सुरू आहे, त्याचे लोकेशन कळवावे, कारण हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे व खूप पुण्याचे कार्य आहे' असे विनोदी मेसेज व्हायरल होत आहेत. एकूणच काय, तर स्मार्ट सोलापूरकरांच्या ओव्हरस्मार्टपणामुळे विनाहेल्मेटधारक निश्‍चिंत होऊन कारवाईपासून स्वत:ची व ग्रुप मेंबरची सुटका करत आहेत. 

हेही वाचा : खुनाच्या गुन्ह्यात आरोपला जन्मठेप 
विनाहेल्मेट पोलिसांचे फोटोही होताहेत व्हायरल 

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणाऱ्या कारवाईला वैतागलेल्या नेटकऱ्यांनी आता विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलिसांचे फोटोही व्हायरल करून, "सर्वसामान्य लोकांवर कारवाई होते, मग या पोलिसांवर कारवाई कोण करणार' असा सवालही विचारला जात आहे. 

हेल्मेट वापरण्याची सवय लावून घ्यावी 
शहरवासीयांनी स्वत:च्या व इतरांच्या जीवितेच्या रक्षणासाठी हेल्मेट वापरणे आवश्‍यक आहे. सोशल मीडियावर मेसेज टाकून कारवाईपासून पळवाटा शोधण्यापेक्षा आपल्या मित्रांच्या जीवितेची काळजी घेऊन त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. यामुळे स्वत:बरोबर इतरांचे जीवही वाचतील. दंडाच्या भीतीपेक्षा हेल्मेट वापरण्याची सवय लावून घ्यावी. 
- लक्ष्मीकांत जाधव, नागरिक 

सोशल मीडियावर प्रबोधन व्हायला हवे 
जिल्ह्यात 25 ते 30 हजार नवीन दुचाकी वाहने रस्त्यावर आली आहेत. या वाहनांबरोबर कंपनीने हेल्मेट दिले आहेत. तरी नागरिक हेल्मेट वापरत नाहीत. आम्ही वाहनधारकांकडून खूप मोठी अपेक्षा करत नाही, स्वत:चा जीव वाचावा म्हणून हेल्मेट वापरण्यास सांगतो. जीव वाचेल व कारवाई होऊ नये म्हणून पळापळ करण्याची गरजही भासणार नाही. सोशल मीडियावर प्रबोधन व्हायला हवे. 
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com