#SataraFlood साथी हात बढाना...पूरग्रस्तांना करा मदत : श्वेता सिंघल

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुरपरिस्थितीत नागरीकांना आवश्‍यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्यामुळे सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर परिस्थितीच्या निवारणासाठी शनिवार (ता. 10) ते सोमवार (ता. 12) शासकीय सुट्टी कालावधीत कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. 
 

सातारा : जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, वाई, सातारा यासह काही तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती, दरड कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे, घर पडणे आदी कारणांमुळे दोन हजार 180 कुटुंबातील नऊ हजार 521 लोकांची प्रशासनाने तात्पुरते स्थलांतर केले आहे.
या पुरग्रस्तांना प्रशासनाकडून दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय पथकही तैनात केले आहे. या पुरग्रस्तांना जिल्हावासीयांनी मदत करावी. ही मदत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. नागरिकांनी ब्लॅकेंट, धान्य, बिस्कीटे यासह जीवनावश्‍यक वस्तुंची मदत करावी तसेच धनादेश देऊन मत करावयाची असल्यास धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (पूर) या नावाने द्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
या मदतीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांनी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून (9604146186) कुणालाही पुरग्रस्तांना मदत करावयाची असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help citizens of flooded area says Shweta Singhal