कुणी जेवण, नाष्टा दिले; तर राहाण्यासाठी काहींनी उघडली कार्यालये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निम्मे कोल्हापूर पाण्याखाली गेले आहे. नेहमीच मदतीसाठी तत्पर असलेल्या कोल्हापूरकरांनी यावेळीही पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी मदतीचे हात पुढे केले. काहींनी भरपावसात भिजत अपार्टमेंट, घरात अडकलेल्या लहान मुले, महिलांना सुरक्षितस्थळी हलविले.

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निम्मे कोल्हापूर पाण्याखाली गेले आहे. नेहमीच मदतीसाठी तत्पर असलेल्या कोल्हापूरकरांनी यावेळीही पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी मदतीचे हात पुढे केले. काहींनी भरपावसात भिजत अपार्टमेंट, घरात अडकलेल्या लहान मुले, महिलांना सुरक्षितस्थळी हलविले. जिल्हा प्रशासन पुरग्रस्तांसाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना काही स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी पुरग्रस्तांना राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली गेली. त्याचे मेसेजेस सोशल मिडीयावर शेअर केले गेले आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. 

रामानंदनगर येथील पुलावर पाणी आले. त्यामुळे तेथील काही घरांत पुराचे पाणी गेले आहे. येथील हॉटेल आर्यनच्या अभिजीत भोसले यांनी पुरपरिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जेवणाची सोय केली आहे. कोल्हापूर सराफ व्यापारी संघानेही राहण्याची व्यवस्था करत मदतीचा हात पुढे केला. देवांग कोष्टी समाजातर्फे मंगळवार पेठेतील चौंडेश्‍वरी हॉल पुरग्रस्तासांठी उपलब्ध करून दिला. उचगाव येथील सातबारा हॉटेलतर्फे राहूल सावंत यांनी आल्पोपहार व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जरगनगर येथील नाना जरग सोशल फांऊडेशनतर्फे श्री कृष्ण मंगल कार्यालय पुरग्रस्तांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. 

जिल्हा न्यायालय, कसबा बावडा येथील इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगची जागा विस्थापितांसाठी खुली करून तेथे जेवणाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. 
स्वयंसिद्धा संस्थेतर्फे दोन चपाती व भाजी अशी पॅकेटस्‌ तयार करून पुरग्रस्तांना वाटली आहेत. संजय घोडावत ग्रुपतर्फे हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. प्राथमिक आरोग्य व्यवस्था, ऍम्बुलन्स, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा व त्यांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर, जेवणाची व्यवस्था व पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था केली होती.

वीरशैव लिंगायत समाजातर्फे दसरा चौकातील विद्यार्थी वसतिगृह व अक्कामहादेवी मंडप पुरग्रस्तांसाठी खुले केले आहे. प्रतिभानगर सोसायटी हॉलमध्ये साठ जणांची राहण्याची सोय केली आहे. गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या कॅंन्टीनमधून राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या नागरिकांना जेवण पुरविले. सम्राटनगर येथील स्वकुळ साळी समाजाचा जिव्हेश्‍वर हॉलमध्ये पुरग्रस्तांसाठी जेवण व राहण्यासाठी सोय केली आहे. 

औषधांचाही पुरवठा 
श्री साई प्रसाद मेडीकलतर्फे पुरग्रस्त तसेच हॉस्पीटलमध्ये औषधांची गरज असलेल्या नागरिकांना औषधे जागेवर पोहोच केली गेली. 

बावडा परिसरातही मदतीचा हात 
कसबा बावडा परिसरातील उलपे मळा, शुगर मिल परिसरातील अनेकांचे स्थलांतर करण्यात आले. या सर्वांची व्यवस्था महापालिका शाळेत करण्यात आली. बिरंजे पाणंद, पाटील मळ्यातील लोकांना श्रीराम सोसायटीच्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या लोकांना आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील व स्थानिक नगरसेवकांनी मदतीचा हात दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help to Flood affected citizens in Kolhapur