इथे..कोरोनाशिवायही  मरण स्वस्त होत आहे...' 

Corona-deaths.jpg
Corona-deaths.jpg

सांगली ः प्रसिध्द लेखक बाबुराव बागुल यांची "मरण स्वस्त होत आहे' या शीर्षकाची एक कथा आहे. हे शीर्षक इथल्या रोजच्या जिंदगीला लागू पडते. देशात दर साडेतीन मिनिटाल अपघातात एकाचा मृत्यू होतो. एकट्या सांगली जिल्ह्यात महिन्याभरात दहाजण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत, खून, आत्महत्या या तर येथे पाचविलाच पुजल्या आहेत. त्यामुळे कोरोनाशिवाय देखील 24 जणांचे बळी गेले आहेत. एकाबाजूला आपल्या रोज कोरोनाचे मिटर पाहण्याची सवय जडली आहे पण कोरोनाशिवाय देखील इथल्या जिंदगीत फारच स्वस्तात भेटणारा मृत्यू अस्वस्थ करणारा आहे. 

कोरोनामुळे रोज बाधीत किती होतात आणि मृत्यू किती होतात हे रोज चेक करण्याची सवय आता अंगवळणी पडू लागली आहे. मृत्यू आणि या विषाणूबद्दलच्या भावना आता बोथट होत चालल्या आहेत. कोरोना मिटर वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यातच दीड हजारहून अधिक रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. मुंबई-पुणे यांचा अपवाद सोडल्यास मृत्यू होणाऱ्यांची संख्या अन्यत्र गंभीर नाही, ही जमेची बाजू आहे. किंबहुना मुंबई-पुण्याहून गैरमार्गाने येणाऱ्यांचा फटका सांगलीसारख्या जिल्ह्याला मोठा बसला आहे.

जसे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसे जनजीवन गेल्या दीड महिन्यापासून अधिकाधिक ठप्प होत जात आहे. लॉकडाऊन तीननंतर जनजीवन थोड्याप्रमाणात तरी सुरळीत होईल याची आशा फोल ठरली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहिले तर सांगलीत नगण्य आहे. संख्या वाढूनही रुग्ण बरे होत आहेत याला अपवाद म्हणजे विजयनगर येथील एकमेव रुग्ण दगावला आहे. पण दुसरी धक्‍कादायक गोष्ट अशी आहे की, जिल्ह्यात 15 एप्रिल ते 15 मे या एक महिन्यात दहा लोक अपघाताचे बळी ठरले आहेत. खून तर येथे पाचविलाच पुजलेत कारण 8 जणांना येथे कोणत्याही रोगाने नाही तर माणसानेच माणसे संपवली आहेत. आत्महत्याही अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

या कालावधीत सहा जणांनी स्वत:चे आयुष्य संपवून टाकण्याचे पाऊल उचलले... देशाचा विचार केला तर दर साडेतीन मिनिटाला एकाचा मृत्यू येथे होत असतो. म्हणजे सुमारे दीड लाख लोक भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. असे म्हणातात की युध्दापेक्षा अपघातात मरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. केंद्रानेच ही आकडेवारी प्रसिध्द केली आहे. त्यामळे ज्या देशात 

आता सध्या लॉकडाऊन आहे. म्हणजे रस्त्यावर पहिल्यापेक्षा दहा टक्‍केसुध्दा वाहने नाहीत तरी सांगलीसारख्या एका जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दहा जण मृत्युमुखी पडले आहेत. बुधगाव, कुची, कसबे डिग्रज, कुंडल, रायेवाडी, तांदुळवाडी आणि कुपवाड येथे हे अपघात झाले आहेत. 
या काळातील महिनाभरातील अंक चाळले तर लक्षात येते की राज्यातही सुमारे साठ लोक अपघातात मृत्यू पावले आहेत. याच काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मात्र एक हजारवर आहे. त्यापैकी सहाशे मृत्यू एकट्या मुंबईत झाले आहेत. त्याखालोखाल पुण्यासह राज्यात चारशे मृत्यू झाले आहेत. 

पण एकाबाजूला कोरोनामुळे लोकांना प्राण गमवावे लागतात हे दुर्दैवच आहे. पण कोरनामुळे होणाऱ्या मृत्यूला टाळण्यात यश मिळाले आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतू लागले आहेत. एक 94 वर्षांची वृध्देनेही कोरोनाला हरवले. यासाठी डॉक्‍टर, प्रशासन, परिचारिका या साऱ्यांना सलामच केला पाहिजे! पण त्याशिवायही सांगलीसारख्या जिल्ह्यात 25 जणांना अन्य कारणांनी जीव गमवावे लागले आहेत. 

एकट्या जतमध्येच तीन खून व सहा आत्महत्या झाल्या आहेत. आता आत्महत्या होतात त्या गरीबी, विविंचनांना कंटाळूनच. भारतातील गरीबी कोरोनापेक्षा कैकपट मृत्यू दरवर्षी घेते. औरंगाबाद जिल्ह्यात रेल्वेने रुळावर झोपलेल्या चौदा जणांना झोपेतच चिरडले...एवढे टोकाचे दारिद्रय जेथे नांदते तेथे माणसाचा मृत्यूशी सौदा येथे फार स्वस्तात होतो. डफळापुरातील 15 वर्षांचा एक मुलगा लॉकाडाऊनमुळे आईला भेटण्यासाठी व्याकूळ झाला होता. तो रत्नागिरीत अडकला होता.

त्याची समस्या त्याचा बाप सोडवू शकला नाही कारण एवढ्या मोठ्या यंत्रणेत एक मुलाला आईची भेट घडविण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही आणि असे प्रश्‍न समजावून घेण्यासाठी संवेदनाही नाहीत. या संवेदनाहिनतेत एक मुलाने आत्महत्या केली. याच जतमध्ये कोरोनाच्या संकटकाळात एका महिलेने आपल्या दोन छोट्या मुलांसह आत्महत्या केली. गरीबी, द्रारिद्रय, सासरी होणारा वाद असे विषय असले तरी लॉकडाऊनच्या काळातील ही घटना आहे. या महिलेलाही तिच्या माहेरची ओढ लागली होती असे कारण पोलिस दप्तरी मिळाले. देशात मरण किती स्वस्तात मिळते याच्या या अनेक कथा अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

गुरुवारची घटना...वाळव्यातील एक 13 वर्षांची मुलगी..वय तसं भातुकलीच्या खेळामधली राणी होण्याचं पण काम करत नाही म्हणून तिच्या बापाने तिला इतकं मारलं की तिचा जीव गेला...हे असे मृत्यू पाहिले की वाटायला लागतं जगात अमेरिका, इटलीसारख्या संपन्न देशातही अद्ययावत वैद्यकीय सेवाही मृत्यूला टाळू शकल्या नाहीत पण भारतासारख्या देशातील चित्र वेगळे आहे. याचा प्रत्यय एकाच सांगलीसारख्या संपन्न म्हणविणाऱ्या जिल्ह्यातील मृत्यूची विविध कारणे शोधताना येवू लागतो. प्रसिध्द लेखक बाबुराव बागुल यांची "मरण स्वस्त होत आहे' या शीर्षकाची एक कथा आहे. हे शीर्षक इथल्या रोजच्या जिंदगीला लागू पडते. 

माणसांच्या व्यथांनी जसे येथे मरण स्वस्त होत आहे तसेच ते रस्त्यावर तर खूपच स्वस्तात मिळते. आपल्या मुलांना भेटण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला येत असलेल्या जोडप्याला अपघातामुळे अर्ध्या रस्त्यातूनच जग सोडून जावे लागले आणि मुलांची भेट अधुरीच राहिली. अशी एक ना दोन लॉकडाऊनच्या काळात हजारो व्यथांनी मानवी जीवन व्यथीत होताना आपण पहात राहिलो...कोठे मुले अडकली आहे.

कोठे पती-पत्नींची ताटातूट झाली आहे. कोणाचा रोजगार हिरावला आहे... मजुरांचे तर तांडेच्या तांडे शेकडो मैल पायपीट करत घरच्यांना भेटण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. टीव्हीच्या पडद्यावर या सर्वांच्या व्यथा पाहून आणि वृत्तपत्रांच्या पानापानांतून यांच्या समस्या वाचताना "नाही रे उजाडत...'चाच अनुभव घेतला.

कोरोनामुळे भय वाढले असले तरी इथल्या लोकांच्या जिंदगीत "मरण आधीपासूनच स्वस्त होते आणि आजही त्याचाच प्रत्यय येत राहतो...जीवन दु:खमय आहे, याचाच अनुभव रोज येत आहे. या काळात जितकी माणुसकी दाखवता येईल तेवढी प्रत्येकाने दाखवाण्याची ही वेळ आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com