हेरिटेज फूडस्‌कडून देशातील सहा राज्यांना एक कोटी रुपयांची मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

सातारा जिल्ह्यात गरजूंना, वंचितांना माेठ्या प्रमाणात मदत कार्य सुरु आहे. शिक्षक, पाेलिस यांच्यासह विविध घटक मदतीसाठी सरसावले आहेत. आता कंपन्या, बॅंका देखील मदत देण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत.

सांगवी : कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी येथील हेरिटेज फूडस्‌ या दूध संघाने देशातील सहा राज्यांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नारा भुवनेश्वरी यांनी प्रसिद्धिपत्रकाव्दारे दिली. 

येथे हेरिटेज फूडस्‌ कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे. या कंपनीच्या देशभरात शाखा आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीच्या वतीने आंध्रप्रदेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 30 लाख, तेलंगणा राज्यासाठी 30 लाख, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व दिल्ली राज्यांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

सांगवी येथील दूध संकलन केंद्रावर उत्पादकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. दूध संकलन केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी केंद्रावर उपाययोजना राबवत असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक ओमकार स्वामी व डॉ. अशोक गावडे यांनी दिली. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिले 15 लाख

सातारा : कोरोना विषाणूमुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रोजंदारी कामगार, व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्व संचालकांचा सभा भत्ता, बॅंकेचे अधिकारी आणि सेवक यांचे एक दिवसाचे वेतन असे एकूण 15 लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा केले आहेत.
 
यासंदर्भात बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ""सातारा जिल्हा बॅंक, बॅंकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बॅंकेने राज्यातच नव्हे, तर देशात ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली. त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. सध्याच्या या कोरोनाच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जरूर ती काळजी घ्यावी.'' 

बॅंकेचे संचालक व सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ""मुख्यमंत्र्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन बॅंक मदतीला धावली आहे. ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.''
 
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ""कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाखा सेवकांनी व ग्राहकांनी जास्तीतजास्त काळजी घ्यावी. हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.'' 
या उपक्रमाचे बॅंकेचे संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने यांच्यासह सर्व संचालक मंडळ, तसेच बॅंकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांनी कौतुक केले. 

तबलीकतील साताऱ्यातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 22 संशयित दाखल; 41 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन; तांबव्यात हाय अलर्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heriatge Foods Donated One Crore To Six States In India