वारसास्थळांचे उलगडले पदर

वारसास्थळांचे उलगडले पदर

कोल्हापूर - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या वारसास्थळांची आज अनोखी सैर घडली. कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘हेरिटेज वॉक’ यशस्वी झाला आणि दडलेल्या वारसास्थळांचे पदर उलगडत गेले. ‘चला, कोल्हापूर जाणून घ्यायला’ अशी साद यानिमित्ताने घालण्यात आली. जागतिक वारसास्थळ सप्ताहानिमित्त कोल्हापुरातील वारसास्थळांची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम झाला. कोल्हापूर हेरिटेज समिती, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभाग यांच्यातर्फे त्याचे आयोजन केले होते. 

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महापौर शोभा बोंद्रे, खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मधुरिमाराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अजय कोराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौकातून हेरिटेज वॉकला सुरवात झाली. 

दसरा चौक, चित्रदुर्ग मठ, चिमासाहेब महाराज चौक, शिवाजी मंदिर, नर्सरी बाग, ब्रह्मपुरी टेकडी, पंचगंगा घाट, महादेव मंदिर, सीपीआर रुग्णालय, महापालिका इमारत, दूध कट्टा, शिवाजी महाराज पुतळा, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, साठमारी, देवल क्‍लब, बिंदू चौक, शिवाजी टेक्‍निकल स्कूल, आईसाहेब महाराज चौक, ट्रेझरी ऑफिस या स्थळांची माहिती दिली. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, इतिहास अभ्यासक राम यादव, अमरजा निंबाळकर, प्रसन्न मालेकर यांनी ही माहिती दिली.

भवानी मंडप येथे शिवकालीन युद्धकलेच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपक्रमाचा समारोप झाला.  खासदार संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, आर्किटेक्‍ट ॲण्ड इंजिनीअर्स असोसिएशन यांनी हा उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला. हेरिटेज वॉकला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील महिन्यात पुन्हा हेरिटेज वॉक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलिस बॅंडसह हलगी, घुमक्‍याचा ठेका

पोलिस बॅंड व हलगी, घुमकं व कैताळच्या ठेक्‍याने दसरा चौकात सकाळी सातलाच रंग भरला होता. प्रत्येक जण हिरिरीने हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी हजर होता. शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहूराजांवरील पोवाडा सादर करत वातावरणात रोमांच पसरला होता. तसेच हेरिटेज वॉकचे ठिकठिकाणच्या संस्थांनी स्वागत करत सहभाग घेतला. 

खासदार संभाजीराजेंची निधी देण्याची घोषणा  
हेरिटेज वास्तूंसाठी विशिष्ट नियमावली तयार करावी. त्यात कोल्हापुरातील तज्ज्ञांनी सहभाग घ्यावा. हेरिटेज वास्तूंच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com