पाऱ्याने ओलांडली चाळीशी  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

कोल्हापूर - यावर्षीच्या जानेवारीच्या मध्यापासूनच ३४, ३५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद सुरू झालेली असतानाच आज हैराण करणाऱ्या उन्हाळ्याने अक्षरश: कहर केला. गेले काही दिवस ३५ ते ३९ डिग्री सेल्सिअसला वर-खाली होणाऱ्या पाऱ्याने आज चाळीशीचा टप्पा पार करत थेट ४१ डिग्री सेल्सिअपर्यंत उसळी घेतली. पाऱ्याच्या या उसळीसरशी शहर परिसरातील संपूर्ण जनजीवनच कोलमडून गेले. दुपारी निर्माण झालेल्या तप्त हवेच्या लाटांनी घरघर फिरणारे फॅनही निष्क्रिय करून टाकले, तर प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा भाजून निघाली.

मध्यरात्री पूर्वेकडून गार वारे वाहत होते. गार वाऱ्याच्या प्रभावामुळे सकाळीही वातावरण काहीसे थंड होते; मात्र साडेअकरानंतर सूर्यबिंब जसे आकाशात वरती सरकले तसे उष्णतेच्या लाटा निर्माण होऊ लागल्या. या लाटांचा प्रभाव सायंकाळी सहा ते साडेसहापर्यंत राहिला. वाऱ्याची गती ११ किलोमीटर प्रति तास राहिली. यामुळे उष्णतेच्या लाटेत अस्वस्थ झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला नाही. आकाश निरभ्र असल्यामुळे दुपारी उन्हाची तीव्रता खूप होती. दुपारी साडेतीननंतर तुरळक ढगांचे पुंजके जमा होऊ लागले, तरीही मावळतीला जाणाऱ्या उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागले. एक वेळ दुपारचे उन परवडले; पण दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत जाणवणारा उन्हाचा चटका नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली. दुपारी कामावर बाहेर पडणाऱ्यांनी गॉगल, टोपी, हातमोजे, फुलशर्ट घातला होता. जेणेकरून तप्त किरणांपासून संरक्षण होईल. मावळतीला झुकणाऱ्या सूर्याची किरणे तिरपी होतात. तिरपी झालेली किरणे पश्‍चिम दिशेने प्रवास करणाऱ्यांच्या डोळ्यांवर पडतात. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येण्याबरोबरच तीव्र डोकेदुखीही होते. तहानेने घसा कोरडा पडून धापही लागते. नेमक्‍या अशा लक्षणांचा अनुभव अनेकांनी घेतला. 

भूपृष्ठही चांगलेच तापले होते; पण आर्द्रता ६० टक्‍क्‍यांच्या वरती न गेल्यामुळे वळवाला अनुकूलता निर्माण झाली नाही. तप्त भूपृष्ठामुळे जमिनीखालील पाण्याचे नळ, गच्चीवरील पाण्याच्या टाक्‍या तापल्यामुळे पाणीही गरम राहिले. भूपृष्ठ तापले, की धुळीचे प्रमाण वाढते. वाऱ्याच्या एका लोटासरशी ही धूळ सर्वत्र पसरते. 

आठवडा बाजारावरही परिणाम 
अलीकडच्या काही वर्षांत उन्हाळ्याची तीव्रता वाढली असली तरी कोल्हापुरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४१ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेले नव्हते; मात्र यावर्षी प्रथमच पाऱ्याने चाळीशीचा टप्पा ओलांडला. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते जसे ओस पडले तसे लक्ष्मीपुरी, कसबा बावडा, आजूबाजूला पसरलेल्या उपनगरात भरणाऱ्या पालेभाज्यांच्या आठवडा बाजारावरही परिणाम जाणवला. फळे, भाजीपाला कोमेजू नये म्हणून व्यापाऱ्यांनी बाजारात प्लास्टिकची शेड उभारली होती. पाण्याचे फवारे टाकून पालेभाजी टवटवीत ठेवली जात होती. कलिंगडे, टरबूज, द्राक्षे, लिंबूपाणी, ताक, लस्सी, सॉफ्ट ड्रिंक्‍सच्या विक्रीत वाढ झाली.

Web Title: High temperature in kolhapur