अबब ! भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ

Shaluchi Bhakri  becomes expensive
Shaluchi Bhakri becomes expensive

सांगली  - गरिबांच्या घरातील प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली. दिवाळीत येणाऱ्या हायब्रीड ज्वारीचे उत्पादन कमी झाले. परिणामी उपलब्ध शाळूचे दर वाढलेत. दिवाळीपूर्वी 35 रुपये किलो असलेला शाळू 45 ते 50 रुपये झाला. गव्हापेक्षा भाकरीचा दर अधिक असल्यामुळे भाकरी श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

ग्रामीण शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. धान्य, वैरण या हेतूने शाळूची लागवड केली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली तरी शहरी भागात मात्र उलट चित्र आहे. चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण शहरात अधिक आहे. गव्हाला मागणी असल्याने ज्वारीचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गव्हापेक्षा शाळूचा दर कमी असायचा. परंतु भाकरीचे शरीराला होणारे फायदे बघून पुन्हा एकदा अनेकजण भाकरीकडे वळत आहेत.

शाळू शहरातील आठवडा बाजारात..

सोशल मीडियावरून देखील शाळूची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात आहे. गरीबा घरची भाकरी श्रीमंतांना गोड वाटू लागली आहे. भाकरी हलके अन्न असल्यामुळे अनेक कुटुंबात त्याचा समावेश असतो. आठवड्यातील किमान पाच-सहा दिवस भाकरी, बदल म्हणून एक-दोन दिवस चपातीची प्रथा पुन्हा सुरू झाली. शहरी भागातदेखील शाळूला मागणी वाढू लागल्यामुळे दर वाढू लागलेत. ग्रामीण भागातील शाळू शहरातील आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.

सांगलीच्या बाजारात दराने गाठली "हाफ सेंच्युरी' 
गतवर्षी दिवाळीनंतर शाळूच्या तुटवड्यामुळे दर वाढले. यंदा पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली. दिवाळीपूर्वी शाळूचा दर 35 रुपयेपर्यंत होता. परंतु दिवाळीनंतर स्थानिक बाजारात हायब्रीड ज्वारी पुरेशी आली नाही. जो आला तो कमी प्रतीचा आहे. त्यामुळे उपलब्ध शाळू वाढला आहे. त्याचा किरकोळ बाजारातील दर 45 ते 50 रुपये झाला. शाळूने प्रथमच "हाफ सेंच्युरी' गाठल्यामुळे गरिबांसाठी भाकरी म्हणजे श्रीमंतीचे लक्षण वाटू लागले आहे. 

अवकाळीमुळे यंदा रब्बीत दुबार पेरणी 

सोलापूर परिसरातील शाळू येण्यास आणखी दोन ते तीन महिने अवकाश आहे. सध्या शिल्लक असलेला शाळूचा दर वाढला आहे. अवकाळीमुळे यंदा रब्बीत दुबार पेरणी करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून महिनाभर उशिराने शाळू येईल. तोपर्यंत दरवाढीचा सामना करावा लागेल. 

आवक घटली...दर वाढले.... 

बाजार समितीमध्ये गतवर्षी एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत 24 हजार 283 क्विंटल शाळूची आवक होती. सरासरी दर 3500 रुपये क्विंटल होता. यंदाच्या वर्षात याच काळात 23 हजार 270 क्विंटल आवक झाली आहे. तर सरासरी दर 4100 रुपये क्विंटल आहे. 

यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू... 

'स्थानिक हायब्रीड ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. दोन-तीन महिन्यांनंतर शाळू बाजारात येईल.' 

बाळासाहेब पाटील (होलसेल व्यापारी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com