इस्लामपूर पालिकेत पाणीपट्टी वाढ विरोधानंतर रद्द

इस्लामपूर पालिकेत पाणीपट्टी वाढ विरोधानंतर रद्द

इस्लामपूर - १३९ कोटी ३५ लाख ९९ हजार ४७० रुपयांच्या तसेच २० कोटी ७९ लाख ९५ हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला आज पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तोट्यात चालणारा पाणीपुरवठा विचारात घेऊन एक हजार लिटरला १० रुपये पाणीपट्टी वाढविण्याच्या प्रशासनाच्या सूचनेला सभागृहात सर्वानुमते विरोध झाल्याने ही वाढ रद्द करण्यात आली.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत सभा झाली. क्रीडा संकुल उभारणी, खेळाची मैदाने, मॅरेथॉन स्पर्धा, हुतात्मा स्मारकाचे आधुनिकीकरण तसेच ऐतिहासिक वारशाचे संवर्धन यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था, अभ्यासिकांची संख्या वाढवणे, प्रभागनिहाय पर्यावरणपूरक उद्याने, ओपन जीम, योगापार्क, पूर्ण घनकचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया केंद्र उभारणे, बचतगट विपणन केंद्र व घरकुल योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी आदी संकल्प करण्यात आले आहेत. 

चर्चेत संजय कोरे यांनी समाजकल्याण वसतिगृह इमारत तातडीने वापरात आणण्याची गरज मांडली. बजेट २ कोटी ७९ लाखाचे महसुली तुटीचे असल्याने काटकसर करण्याची सूचना केली. विश्वनाथ डांगेनी वास्तववादी अर्थसंकल्पाची अपेक्षा मांडली. शहाजी पाटील यांनी अर्थसंकल्पात इच्छाशक्ती कमी असल्याचा आरोप करत प्रेरणा अभियानाचा उल्लेख नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विक्रम पाटील यांनी एक कोटी खर्चाच्या जलतरण तलावाच्या प्रस्तावाची सूचना करत व्यावसायिकांना एनओसी देताना पाच हजार रुपये घेतले जातात, ते कमी करण्याची मागणी केली.

सतीश महाडिक यांनी पालिकेला शासनाकडून आलेल्या अनुदानाची रक्कम कोणत्या बँकेत आणि किती व्याजदराने ठेवलीय याची चौकशी करत अकौंट विभागाने चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. कमी व्याजाने मोठी रक्कम गुंतविल्याचे कागद त्यांनी सभागृहात सादर केले. पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. यात नुकसान आढळल्यास संबंधितांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

संजय कोरे यांनी भत्ता, मानधन वाढवण्याची मागणी केली. ते म्हणाले, "सुरवातीला ३० रुपये भत्ता होता. ते पाकीट घरी नेऊन बायकोला द्यायचो. तेव्हा ती म्हणायची, एवढंच का? आजही १०० रुपये बघून ती तेच म्हणते. इस्लामपूरसारख्या ब वर्ग नगरपालिकेतील सदस्याला १०० रुपये भत्ता म्हणजे कमीपणाचे आहे. आमदार, खासदार, मंत्री यांना भरघोस रक्कम मिळत असताना नगरसेवकांना इतके कमी मानधन का?" यावर महिला सदस्य खळखळून हसत होत्या. उपस्थित सर्वांनीच श्री. कोरे यांच्या मागणीचे समर्थन केले.

अर्थसंकल्प दृष्टिक्षेप -
■ महसुली जमेकडील बाबी : २९, ५१,२१०००, खर्च : ३२,२९, ८४५००
■ भांडवली जमेकडील बाबी : ७३,०५,६७०००, खर्च : १०३, २४, ०००००
■ असाधारण जमेकडील बाबी : ३, ८७,२७०००, खर्च : ३, ८०, १७०००
■ सन २०१८-१९ चे अंदाज : १६०, १५, ९४४७०
■ सन २०१९-२० चे अंदाजपत्रक : १३९, ३५, ९९४७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com