"अल्लाह'चे बंद्यांकडून मंदिर धुवायला पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

सांगली - पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...जिसेमें मिलाए उस जैसा...पाण्याला खरंतर कुठलाच रंग नाही. ना धर्म, ना जात...महापुराचं पाणीही वस्ती, जात, धर्म हे पाहून आत घुसलं नाही. सांगली शहरातील मंदिर आणि मशिदीही पाण्याखाली बुडाल्या. प्रचंड घाणी साचली. ही धर्मस्थळे धुण्याचे काम सध्या सुरु आहे. पाणी पाठवले जातेय सह्याद्रीनगर येथील खोजा सिया आशरी जमातच्या विहिरीतून. "अल्लाह' चे बंदे मंदीर धुवायला स्वच्छ पाणी देताहेत. 

सांगली शहरातील शंभर फुटी, गावभाग, वखारभाग, खणभाग, गवळी गल्ली या भागातील शंभराहून मंदीर आणि मशिदी पाण्याखाली होत्या. सांगलीचे आराद्य दैवत श्री गणरायाच्या मंदिरात पाणी होते. शंभर फुटी रस्त्यावरील पाकिजा मशिदीतही पाणी होते. पूर ओसरला आणि लोकांची धावपळ सुरु झाली. घरांत, मंदिरात फुटभर गाळ साचला होता. प्रचंड कचरा येऊन पडला होता. वीज बंद, नळाला पाणी नाही. घर तर धुणार कसे? महापालिकेने पाण्याची सोय केली, मात्र ते पाणी होतं काळ्या खणीचं. त्यानं लोकांनी घरं धुतली खरी, मात्र मंदिर आणि मशिद धुण्याचा विषय आला तेंव्हा साऱ्यांना विरोध केला. काळ्या खणीच्या घाण पाण्याने पवित्र धर्मस्थळ धुवायचे कसे? मुद्दा रास्त होता. त्यानंतर धावपळ उडाली आणि मग पुढे आला खोजा समाज. 

सह्याद्रीनगर येथे खोजा समाजाची वस्ती आहे. तेथे त्यांच्या मालकीची विहिर आहे. त्याला मुबलक पाणी आहे. मुंबई, सांगली, सातारा येथील टॅंकरने हे पाणी नेण्यात आले. काही शे टॅंकर भरून येथून पाणी नेले जात आहे. झरा अखंड वाहता आहे. या मदतीचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया या समाजातील जाफर देवजानी, महंमद जैदी, युनुस भिमाणी, अकबर भोजाणी, अब्बास नायाणी, अब्बास देवजाणी यांनी व्यक्त केली. नगरसेवक संतोष पाटील यांनी या मंडळींचे आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Temple washing by water from Muslim owned tank