सोलापुरातील हिप्परगा तलाव दोन वर्षांनी भरला 

hipparga
hipparga

सोलापूर : सोलापूर शहराच्या गावठाण भागाला पाणीपुरवठा होणारा हिप्परगा तलाव तब्बल दोन वर्षांनी भरू लागला आहे. उजनी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी आणि पावसामुळे या तलावातील पाणी जवळपास 50 टक्के झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा तलाव पूर्णपणे कोरडा पडला होता. 2017 मध्ये तलावात 60 टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता. 

उजनी धरण पूर्णपणे भरल्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी हिप्परगा तलावापासून सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या जॅकवेलच्यामाध्यमातून भवानी पेठ पाणीपुरवठा केंद्रात आणले गेले. दरम्यान मोहोळ ते कुरूलदरम्यान कालवा फुटल्याने कारंबा कालव्यात येणारे पाणी थांबले. त्यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन फिस्कटले होते.

त्यामुळे कालव्यातून येणारे पाणी चर मारून हिप्परगा तलावात घेण्यात आले. तेथून हे पाणी ग्रॅव्हिटीने भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहराला पुरविण्याचे नियोजन झाले, पण कालवा फुटल्यामुळे हे नियोजन विस्कळीत झाले. दरम्यान, कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुन्हा सोडण्यात आले. मात्र त्याचा वेग पुरेसा नव्हता. दरम्यान, गेल्या सात ते आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे तसेच उजनी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हिप्परगा तलावाचे पात्र पाण्याने पूर्णपणे व्यापले आहे. अगदी पहिल्या इंटकवेलपर्यंत पाणी पसरले आहे. त्यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, कालव्याचे पाणी उपलब्ध असेपर्यंत तलावातील पाणी महापालिकेने उचलू नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 

हिप्परगा योजनेविषयी थोडेसे.... 
सर्वांत जुनी योजना 
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकरुख, उजनी आणि टाकळी हे तीन स्रोत आहेत. त्यापैकी सर्वांत जुनी योजना ही एकरुख तलावाची आहे. 1932 पासून या योजनेतून पाणी घेतले जाते. 1932 ते 1946 पर्यंत या केंद्रावर फिल्ट्रेशनची सोय नव्हती. 1946 पासून ती सोय झाली. 

साडेचार दशलक्ष लिटर क्षमता 
सुमारे साडेचार दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या टाकीची आहे. ती ब्रिटिशकालीन असल्याने टाकीसाठी वापरलेले स्टील गंजले आहे. टाकीचा संपूर्ण परिसर धोकादायक झाला आहे. सुमारे 25 बाय 40 इतक्‍या आकाराचा तुकडा निघाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला जाळीचे आवरण लावण्यात आले आहे. एखादी वजनदार व्यक्ती या टाकीच्या स्लॅबवरून चालत गेली तर ती थेट टाकीत पडण्याची शक्‍यता आहे, अशी सद्यःस्थिती आहे. 

हा परिसर आहे अवलंबून 
या योजनेवर घोंगडेवस्ती, मड्डीवस्ती, जोडभावी पेठ, रविवार पेठ, जोडबसवण्णा पेठ, मंत्री चंडकनगर, हनुमाननगर, शाहीरवस्ती, जम्मावस्ती, मुकुंदनगर, जम्मा चाळ, बुधले गल्ली, मराठावस्ती, बाळीवेस, पंजाब तालीम, वडार गल्ली, तुळजापूर वेस, पश्‍चिम मंगळवार पेठ, विजापूर वेस, कुंभार वेस आणि बोरामणी तालीम परिसर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com