कोल्हापूरला ऐतिहासिक चर्चचा वारसा

कोल्हापूरला ऐतिहासिक चर्चचा वारसा

बहुतांशी चर्च हेरिटेज वास्तूंच्या यादीत; ख्रिसमनिमित्त यंदाही भरगच्च कार्यक्रम

कोल्हापूर - कोल्हापुरातही ख्रिश्‍चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. येथील ऐतिहासिक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशू ख्रिस्तांची उपासना केली जाते. वायल्डर मेमोरियल चर्च, ब्रह्मपूरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर, ऑल सेंटस चर्च, होलिक्रॉस चर्च, सेंव्हथ डे चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, ख्रिश्‍चन चर्च आदी चर्चेस येथे आहेत. बहुतांशी चर्चचा हेरिटेज वास्तूंच्या यादीतही समावेश झाला आहे.

वायल्डर मेमोरियल चर्च
महापालिकेशेजारी असणारे वायल्डर मेमोरियल चर्च हे कोल्हापुरातील सर्वांत जुने चर्च असून, या चर्चला सुमारे १६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चर्चची स्थापना अमेरिकन मिशनरी रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी १८५७ मध्ये केली. महापालिकेच्या मागे असणारे हेच ते चर्च. तत्कालीन बाबासाहेब महाराज यांनी यासाठी मोठी मदत केली. 

ही वास्तू आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. या चर्चसाठी लागणारा दगड रंकाळ्याच्या खाणीतून स्वता रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी खोदून आणला. त्यामुळे या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले. कालातंराने ही जागा अपुरी पडत असल्याने न्यू शाहूपूरी येथे काही वर्षांपूर्वी आणखी नवे चर्च बांधण्यात आले. कोल्हापूर शहरातील हे सर्वात मोठे चर्च आहे. नाताळ सणानिमित्त गेले महिनाभर येथे विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.

ब्रह्मपूरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर
ब्रह्मपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर हे चर्चदेखील शंभर वर्षांपूर्वीचे आहे. पन्हाळ्याकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करतानाच पंचगंगा नदी ओलांडल्यानंतर हे ऐतिहासिक चर्च दिसते. हे चर्चदेखील शहरात प्रसिद्ध असून कोल्हापूर डायसिस कौन्सिलच्या अखत्यारित येते. 

ऑल सेंटस चर्च
ताराबाई पार्कातील ऑल सेंटस चर्च हेदेखील ऐतिहासिक चर्च आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे चर्च अनेकांचे लक्ष वेधून घेते. ब्रिटीशकालीन बांधणीचे हे चर्च १८८१ मध्ये बांधले आहे. चर्चमध्ये ब्रिटीशकालीन फर्निचर, डायस व इतर साहित्य आहे. नाताळ सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथे कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. 

ख्राईस्ट चर्च केडीसी
कोल्हापूर डायेसीस कोन्लिसचे नागाळा पार्क येथे ख्राईस्ट चर्च आहे. या चर्चचे पाचशेहून अधिक सभासद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हे चर्च उभे आहे. नाताळनिमित्त येथे ख्रिस्तजन्माचा देखावा साकाण्यात आला आहे.
 

विक्रमनगर चर्च 
विक्रमनगर येथील चर्चलाही ५० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी येथे छोटेसे चर्च होते. २०००मध्ये नवी इमारत बांधली आहे. या चर्चचे कार्यक्रमही गेले महिनाभर सुरू आहे. १० डिसेंबरला चर्चच्या नव्या इमारतीचा वर्धापन दिन साजरा झाला. या निमित्तानेही विविध कार्यक्रम आयोजित केले होते.
या प्रमुख चर्चबरोबरच शहरात इतरही अनेक ठिकाणी चर्च आहेत. होलिक्रॉस चर्च, सेंव्हंथ डे ॲडव्हेनटीज चर्च, पेन्टिकॉस्ट चर्च यासह प्रार्थना, स्तुती आराधना करणारे लहान- मोठे अनेक ग्रुप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com