जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास

History Of Shivaji University Establishment In Kolhapur
History Of Shivaji University Establishment In Kolhapur

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ म्हणूनच ओळखायचे, की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा त्याचा नामविस्तार करायचा, या चर्चेला आता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 59 वर्षानंतर सुरुवात झाली आहे. फक्त शिवाजी हा शब्द म्हणजे शिवाजी महाराजांचा अनादर असल्याची काहींची भावना आहे, तर शिवाजी हा शब्द तुम्हाला आम्हाला जवळचा वाटणारा आहे, माझा शिवाजी, माझा शिवबा या शब्दात शिवाजी महाराजांच्या बद्दलची आंतरिक जवळीक आहे, अशी अनेकांची भावना आहे.

नामविस्ताराबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलपती भगतसिंग कोशियारी यांच्याकडे केली आहे. नामविस्तार होईल, नाही होईल हा पुढचा भाग आहे. पण यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाची उभारणी कोल्हापुरातील सामान्य माणसाच्या रुपया रुपयांच्या निधीतून आणि पेठांपेठातील, तालमीतालमीतील कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून कशी झाली. याचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाची स्थापना अगदी सहज झालेली नाही. कोल्हापूरने काही मागितलं आणि ते लगेच मिळालं, असं आजवर कधीही घडले नाही. विद्यापीठाच्या स्थापनेमागे ही ही अशीच अडथळ्याची भिंत उभी केली होती. पण लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने विद्यापीठ कोल्हापूरसाठी मंजूर झाले. आणि त्याच्या उभारणीसाठी सारे कोल्हापूर अक्षरक्ष: घाम गाळून राबले. त्यावेळी कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती.

श्रमदानातून उभारले विद्यापीठ

नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठ तर मंजूर झाले पण विद्यापीठाला जमिनीची आवश्‍यकता होती आणि शहराच्या पूर्वेला खाजगी मालकीची जागा विद्यापीठाला उपयोगी पडणारी होती. जगदाळे , सरनाईक, पायमल, साळुंखे , थोरात , मंडलिक, माने यासारख्या बहुजन समाजातील लोकांच्या या जागा होत्या. या सर्वांनी फारशी खळखळ न करता अवघ्या 800, हजार ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्या जागा विद्यापीठासाठी दिल्या. केवळ जागाच दिल्या असे नव्हे तर कोल्हापुरातल्या तालमीतालमीचे कार्यकर्ते श्रमदानासाठी या माळावर गेले. त्यांनी माळावरचे गवत कापून काढले. ओबड-धोबड जमीन घाम गाळून एका लेव्हलला आणली. 

मदतीसाठी एक एक रुपयाची कुपणे

या श्रमदानासाठी रोज एका तालमीचे कार्यकर्ते ट्रक भरून श्रमदानासाठी जात होते आणि दिवस मावळल्यावर परत येत होते. एवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक एक रुपयाची कुपणे काढली गेली होती. केशवराव जगदाळे, रामभाऊ उबाळे, डी.एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साठम, काका राऊत, ए. आर साळोखे हे कार्यकर्ते सायकलवरून गावभर फिरून ही कुपणे खपवत होते. 
आणि महागावकर सदनात (सध्याचे ओपल हॉटेल) येथे विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय होते. तेथे रोजच्या रोज ते पैसे जमा करत होते. अशा कष्टातून आणि अशा निष्ठेतून शिवाजी विद्यापीठ उभे राहिले.

आप्पासाहेब पवार पहिले कुलगुरू  

या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली. शिवाजी विद्यापीठाची परिक्षा एकदाही पुढे जाणार नाही आणि निकाल एकदाही लांबणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी फार मोठी कामगिरी केली. पहिले कुलसचिव श्री वैद्य होते. शिवाजी विद्यापीठाची वाटचाल सुरू झाली. विजार, शर्ट, स्लीपर घालणारी मुले शिकायला येऊ लागली. 1969 मध्ये "कमवा व शिका' ही योजना सुरू झाली. त्यानंतर एकाहून एक चांगल्या कुलगुरू, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला एक वेगळी दिशा दिली आणि देशात शिवाजी विद्यापीठ या नावाला एक वेगळीच किनार लाभली गेली. 

59 वर्षांनी नामविस्ताराची चर्चा 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यातील शिक्षणाची गंगा या विद्यापीठामुळे खळखळून वाहू लागली. विद्यापीठाच्या उभारणी वेळीच विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ अशी चर्चा झाली होती, पण सर्वानुमते शिवाजी या शब्दात असलेली आंतरिक ओढ लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आणि आज पुन्हा 59 वर्षांनी नाम विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com