वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोर

वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोर

कोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली, देवळाजवळ दिसतात. कोठे त्या भग्नावस्थेत पडल्या आहेत, काही ठिकाणी पुजल्या गेल्या आहेत तर काही ठिकाणी या शिळाभोवती गूढ वलय तयार झाले आहे. करवीर तालुक्‍यातील बीड या गावात तर दीड-दोनशेहून अधिक शिळा म्हणजे ‘वीरगळ’ अशी प्राचीन इतिहासानुसार ओळख आहे. त्या त्या काळातील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या वीरगळची पुनर्स्थापना उद्या बीडमध्ये करण्यात येणार आहे. 

बीड या गावाला फार जुना इतिहासाचा वारसा आहे. साधारण १२०० वर्षांपूर्वी तेथे भोज राजाची राजधानी होती. त्यावेळी तेथे सोन्याच्या नाण्याचा वापर होता. नाणीही तेथेच तयार होत होती. आजही थोडेफार उत्खनन केले की काही ठिकाणी अशी नाणी सापडतात. गावाच्या इतिहासावरचे संशोधन झाले आहे. गावात ऐतिहासिक पुरावेही आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गावात विखुरलेल्या अवस्थेतील दीडशे-दोनशे वीरगळ आहेत. त्यातील वीस-पंचवीस मंदिरांच्या आवारात व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. या वीरगळ म्हणजे युद्धात लढताना वीर मरण आलेल्या वीरांच्या स्मृती आहेत. लढताना मृत्यू आला तर त्याला स्वर्गात स्थान मिळते, अशा आशयाची शिल्पे उभ्या दगडावर खोदलेली आहेत. एका गावात दीडशे-दोनशेहून अधिक अशा वीरगळ आहेत. तेथे घडलेल्या लढाईच्याच त्या स्मृती आहेत. 

अशा वीरगळ व्यवस्थित राहाव्यात, त्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या हेतूने शिवशक्ती प्रतिष्ठान काम करत आहे. उद्या ते बीडमधील वीरगळ एकत्रित करणार आहेत. त्याचे वर्गीकरण करणार आहेत. चांगल्या वीरगळी सिमेंट-वाळूचे टप्पे करून त्यात त्यात उभ्या करणार आहेत. या वीरगळी म्हणजे काय? त्याची रचना कशी असती? त्या का उभ्या करतात? साधारण त्या कोणत्या काळातील? याची माहिती एका फलकावर दिली जाणार आहे, जेणेकरून नव्या पिढीला त्याची माहिती होऊ शकणार आहे. 

ग्रामपंचायत, पुरातत्त्वचे सहकार्य
या उपक्रमासाठी बीड ग्रामपंचायत, पुरातत्त्व विभाग यांनी सहकार्य केले आहे. उपक्रमात सातप्पा कडव, विजय कताळे, नंदू कदम, स्वप्नील पाटील, शिरीष जाधव, योगेश रोकडे, विनाय चौगुले, करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सत्यजित पाटील, बबन गावडे, रवींद्र वरूटे, भीमराव पानारे, उत्तम वरुटे, मच्छिंद्र चौगुले यांचे संयोजन आहे. 

या वीरगळी म्हणजे स्थानिक प्राचीन इतिहासाचे प्रतीक आहेत. अनेक गावांत या वीरगळी आहेत. पण त्या दंतकथांचे प्रतीक ठरल्या आहेत. त्यामुळे त्याचा नेमका इतिहास नव्या पिढीसमोर आणला जाणार आहे. 
- साताप्पा कडव, 

   अध्यक्ष, शिवशक्ती प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com