राहुल गांधींनी मैदानातून पळ काढला - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असताना राहुल गांधी यांनी मात्र मैदानातून पळ काढला. एकप्रकारे त्यांनी पराभव मान्य केला असून, अशाने कॉंग्रेस संपून जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले.

कोल्हापूर - लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असताना राहुल गांधी यांनी मात्र मैदानातून पळ काढला. एकप्रकारे त्यांनी पराभव मान्य केला असून, अशाने कॉंग्रेस संपून जाईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले. सकाळी अकराच्या सुमारास शहा यांचे आगमन झाले. सकाळपासून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षा व्यवस्था कडक होती. 

प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, हिंदुराव शेळके आदींनी शहा यांचे स्वागत केले. 
चर्चेची माहिती महेश जाधव यांनी दिली. ते म्हणाले, ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अपेक्षित असताना ते मैदान सोडून पळाले आहेत. महाराष्ट्रात तसेच हरियानात निवडणूक असताना त्यांनी येथे थांबणे आवश्‍यक होते. आम्ही दोन खासदारांवर सुरवात केली.

अवघे शंभर लोक सभेला उपस्थित असतील, अशा पाचशे सभा मी घेतल्या. त्रिपुरामध्ये अवघे अकरा लोक सभेला होते. नंतर बाजारात गेलो, तेथे अडीचशे जणांना सभासद होण्याची विनंती केली. त्यांच्या नातवाईकांना सोबत आणण्याचे आवाहन केले. रात्री एक हजार लोकांची सभा घेतली. आज त्रिपुरा येथे दोन तृतीयांश बहुमताने आम्ही सत्तेत आहोत. अडीचशे इतक्‍या सभासद नोंदणीतून पक्षाची बांधणी केली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खासदार असताना आम्ही सत्तेत आलो. 

दरम्यान, जिल्ह्यात युती नेमकी किती जागावर लढत आहे, बंडखोरीची काय स्थिती आहे? याची माहिती त्यांनी घेतली. जाधव यांनी दोन जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून, दोन्ही उमेदवार सक्षम असून ते मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील, असेही सांगितले. राहुल चिकोडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा ढवळून काढला असल्याचे सांगितले. 

शहा यांची रविवारी तपोवन येथे सभा शक्‍य 
दरम्यान, शहा यांची सभा रविवारी (ता. 13) तपोवन मैदानावर होण्याची शक्‍यता आहे. उजळाईवाडी विमानतळावर आज सकाळी शहा यांचे आगमन झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी आग्रह धरला. राज्यातील सभांचे वेळापत्रक व्यस्त आहे, असे श्री. शहा यांनी सांगितले. रात्री सभेसंबंधी मेसेज आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. 

विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त 
मंत्री शहा विमानतळावर येणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताची मोठी तयारी केली होती. ज्यांच्याकडे पास आहेत, त्यांच्याशिवाय कुणालाही विमानतळावर जाण्यास मनाई होती. विमानतळाच्या संरक्षक भिंतींच्या पलीकडे पोलिस तैनात होते. शहा जतला निघून गेल्यानंतरही पोलिसांचा बंदोबस्त कायम राहिला. विमानतळाचा मुख्य रस्ता वाहनांसाठी बंद होता. रस्त्याच्या उजव्या बाजूने पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था होती. उजव्या आणि डाव्या बाजूने विमान अथवा हेलिकॉप्टर कुणाच्या नजरेस पडणार नाही याची व्यवस्था होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah comment on Rahul Gandi