होम क्वॉरंटाइन डॉक्टरच्या कुुटुंबाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

अनोळखी 10 ते 15 जणांनी घरावर दगडफेक करीत लाठ्या-काठ्या घेऊन आमच्यावर हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. घर जाळून टाकण्याची धमकी दिली. 
 

अकोले ः तालुक्‍यातील मुथाळणे येथे "होम क्वारंटाईन' असलेल्या डॉक्‍टर कुटुंबीयांवर भावकीच्या वादातून जमावाने हल्ला केल्याच्या आरोपावरून अकोले पोलिसांनी 13 जण आणि अन्य 10 ते 15 अज्ञात व्यक्तींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत डॉ. दत्तात्रय कचरू सदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुथाळणे येथील बाळासाहेब पुंजा सदगीर, पोपट गणपत सदगीर, मारुती गणपत सदगीर, बाळू पुंजा सदगीर, कोंडाबाई गणपत सदगीर, भाऊसाहेब गणपत सदगीर, सविता बाळू सदगीर, जिजाबाई पुंजा सदगीर अनिल पुंजा सदगीर, मीराबाई पोपट सदगीर, गणेश नामदेव सदगीर, सखूबाई भाऊसाहेब सदगीर सगुणा मारुती सदगीर यांच्यासह अनोळखी 10 ते 15 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - मरकजला गेलेल्या २१जणांना बाधा

फिर्यादीत म्हटले आहे, की मी व पत्नी डॉ. कीर्ती, मुलगा अरव, भाऊ बाळासाहेब व देवराम, पुतणे, भाऊ, भावजय, आई-वडील, असे एकत्र राहतो. माझा भिवंडी येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. पुतण्या ऋषिकेश देवराम सदगीर कझाकिस्तानमध्ये शिक्षणासाठी होता. तो 17 मार्च रोजी भारतात माझ्याकडे आला असता, मुंबई विमानतळावरून आम्ही कुटुंबासह "होम क्वारंटाईन' करून गावी आलो. 20 दिवसांपासून गावी राहत आहोत.

मंगळवारी सकाळी 11 वाजता मी आणि भाऊ देवराम ट्रॅक्‍टरसाठी मोटरसायकलवर डिझेल घेऊन जात असताना आमचा भाऊबंद बाळासाहेब पुंजा सदगीर व इतर 10 ते 12 जणांनी आम्हाला दगड व काठीने मारहाण केली. मोटरसायकलची तोडफोड केली. त्यातील काही जण दारू प्यायलेले होते.

चक्रधर सदगीर यांनी मध्यस्थी करून आम्हाला घरी आणले. नंतर पुन्हा साडेअकरा वाजता वरील 13 जणांनी व अनोळखी 10 ते 15 जणांनी घरावर दगडफेक करीत लाठ्या-काठ्या घेऊन आमच्यावर हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. घर जाळून टाकण्याची धमकी दिली. 
दरम्यान, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Quarantine Doctor attacks family