रुग्णालये, आरोग्य केंद्रात बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

सांगली - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सिव्हिल हॉस्पिटल, सर्व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास पोलिस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्तभेट राहील. रुग्णालय किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले किंवा अरेरावी पोलिस विभागाकडून खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

सांगली - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सिव्हिल हॉस्पिटल, सर्व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास पोलिस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्तभेट राहील. रुग्णालय किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले किंवा अरेरावी पोलिस विभागाकडून खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

राज्यात काही ठिकाणी डॉक्‍टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिकारी आणि डॉक्‍टर यांची  बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात काल झाली. डॉक्‍टर व रुग्णालयाची सुरक्षितता याचा आढावा घेऊन सुरक्षितता पुरवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीत सध्याची पोलिस सुरक्षितता कितपत आहे? याची माहिती घेतली. डॉक्‍टरांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर हल्ले किंवा अरेरावीचे प्रकार टाळण्याबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.

चर्चेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व सांगली सिव्हिल हॉस्पिटल, सर्व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे २४ तासांसाठी पोलिस  सुरक्षा पुरवली जावी असे ठरले. सर्व शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी पोलिसांची गस्तभेट वाढवण्याचे ठरले. सर्व पोलिस उपाधीक्षक, पोलिस ठाण्याचे अधिकारी, दिवस व रात्र गस्तीवरील अधिकारी-कर्मचारी यांनी भेट द्यावी, असा निर्णय घेतला. पोलिसांच्या सुरक्षेबरोबर खासगी सुरक्षा रक्षक वाढवण्यात येणार आहे.

रुग्णालये आणि डॉक्‍टर यांची जनतेला आवश्‍यकता  आहे. त्यांची सेवा गरजेची आहे. रुग्ण आणि नातेवाइकांनी डॉक्‍टरांबद्दल मनात आदरभाव जागृत  करावा व संयम बाळगावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. रुग्णालय किंवा डॉक्‍टरांवर हल्ला केला तर खपवून घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत अशा कृत्यांची दखल घेऊन गुन्हे नोंदवले जातील. संबंधितांना त्वरित अटक करून तपास केला जाईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली.

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ. प्रभाकर गुरव, सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र भागवत, आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. गिरीगोसावी, डॉ. एस. आर. कवठेकर, पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील, डॉ. दीपाली काळे, निरीक्षक रवींद्र डोंगरे, अनिल गुजर,  राजेंद्र मोरे, श्रीकांत पिंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: hospital, health center bandobast