खाद्यपदार्थासह "लॉजिंग'साठी आग्रह, हॉटेल व्यावसायिकांचे सरकारला साकडे 

hotel
hotel

सांगली ः राज्यात हॉटेल व्यवसायाला काही अटींसह मान्यता देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी खाद्य पदार्थ विक्रीसह लॉजिंग अर्थात निवास व्यवस्थेलाही काही अटींसह मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. व्यापार, उद्योगासह सिनेचित्रीकरण, लग्न सोहळे सुरु झाल्यामुळे आता निवास व्यवस्था गरजेची झाली आहे. तीन महिने खूप भार सोसला, आता तो पेलवत नसल्याचे आर्जव व्यावसायिकांनी केले आहे. 


गेल्या 22 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेंव्हापासून म्हणजे तब्बल साडेतीन महिने हॉटेल व्यवसाय शंभर टक्के बंद आहे. केवळ काही ठिकाणी पार्सल व्यवस्था सुरु आहे. एकूण व्यवसायाच्या तुलनेत ही उलाढाल अवघी 10 टक्केही नसल्याचे हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष लहू भडेकर यांनी स्पष्ट केले. लॉजिंग व्यवसाय पूर्ण थांबला आहे. पण, यावर अवलंबून कामगारांना कामावरून कमी करणे शक्‍य नाही. अचानक व्यवसाय सुरु करायची वेळ आल्यानंतर नवे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे काम नसताना कामगारांना पगार द्यावा लागत आहे. त्याचा ताण व्यावसायिकांवर आला आहे. आता हॉटेल सुरु करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केली आहे. खाद्य पदार्थ विक्री करताना काही अटींसह मान्यता दिली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन, एका टेबलवर दोनच लोकांची आसन व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर, प्राथमिक आरोग्य तपासणी करून हॉटेलमध्ये प्रवेश अशा बाबींचा त्यात समावेश असण्याची शक्‍यता आहे. याच अटींसह लोकांना निवासाचीही मान्यता द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. 


येथील हॉटेल व्यावसायिक शैलेश नायक म्हणाले, ""साडेतीन महिने म्हणजे जवळपास शंभर दिवसांहून अधिक काळ हॉटेल बंद आहेत. हे नुकसान प्रचंड मोठे आहे. आम्ही कर्मचारी कमी केलेले नाहीत. रोजचा देखभालीचा खर्चही कमी झालेला नाही. आता अजून प्रतिक्षा करणे परवडणारे नाही. सरकारने सकारात्मक विचार करून लॉजिंगला मान्यता द्यावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com