गारगोटी येथे शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

गारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा शिवाजी ऱ्हाटवळ (वय १६) असे  तिचे नाव आहे.

गारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा शिवाजी ऱ्हाटवळ (वय १६) असे  तिचे नाव आहे. आगीत घरासह प्रापंचिक साहित्य जळून खाक  झाले. यात सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले.                 

घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली. पोलिसांनी सांगितले की, सोनारवाडीत बस स्थानकानजीक शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांचे घर आहे. त्यांना अपूर्वा व अश्‍विनी या दोन मुली आहेत. यातील अपूर्वा आजारी असल्याने शाळेला गेली नव्हती. तर मोठी मुलगी अश्विनी ही घरीच होती. सकाळी वडील शिवाजी पत्नीसह शेताला गेले होते. दरम्यान, दुपारी अचानक घरात शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटने घरातील साहित्याला आग लागली.

माळ्यावरील लाकूड, गवत, शेणी पेटल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. याचवेळी माडीवर असलेली अपूर्वा ही आगीत सापडली. तिला बाहेर पडता न आल्याने जळून खाक झाली.
ही दुदैॅवी घटना पाहताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपअधीक्षक अनिल कदम, पोलिस निरीक्षक उदय डुबल, माजी जि. प. सदस्य राहुल देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी एस. एन. भोई, पोलिसपाटील हरिदास राणे, पोलिस हवालदार संभाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी पी. पी. रिंढे आदींनी घटनास्थळी पंचनामा केला.

बहिणीला मनसिक धक्का
दरम्यान, त्यांच्या  घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजारील ग्रामस्थांनी धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. सुदैवाने शेजारील घरांना आग लागली नाही. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेने अश्विनीला जोरदर मानसिक धक्का बसला.
 

Web Title: house burnt incidence in Gargoti