प्राण्यातील मधुमेह ओळखायचा कसा अन् त्यावर उपाय काय ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

‘‘जनावरांत टाईप टू प्रकाराचा मधुमेह जास्त प्रमाणात दिसतो. जनावरांचा लठ्ठपणा, स्वादुपिंड, थायईरॉईड, किडनीच्या आजारामुळे मधुमेह झाल्याचे दिसते. तर कधी उत्तेजक औषधे जास्त दिवस सुरू ठेवल्यासही जनावरांना मधुमेह होतो.

कोल्हापूर - ‘‘घरात पाळलेल्या जनावराला हौसेने काहीही खायला घालणे, यातही गोड पदार्थ खात नसले तरी त्याला चारणे किंवा सतत एकाच प्रकारचे खाद्य देऊन बांधून ठेवणे अशा कृतीचा फटका पाळीव जनावरांच्या आरोग्याला बसत आहे. कुत्रे, मांजरांसोबत बैलांनाही मधुमेह झाल्याचे चित्र आहे. यात जिल्ह्यात महिन्याला किमान दोन-चार बैलांना मधुमेह झाल्याचे दिसते. जनावरांना नियंत्रित, संतुलित आहाराबरोबर व्यायाम देणेही महत्त्‍वाचे आहे,’’ अशी माहिती शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सॅम लुड्रीक्‍स यांनी दिली.

जनावरांना होतो टाईप टुचा मधुमेह 

डॉ. लुड्रिक्‍स सांगतात, ‘‘जनावरांत टाईप टू प्रकाराचा मधुमेह जास्त प्रमाणात दिसतो. जनावरांचा लठ्ठपणा, स्वादुपिंड, थायईरॉईड, किडनीच्या आजारामुळे मधुमेह झाल्याचे दिसते. तर कधी उत्तेजक औषधे जास्त दिवस सुरू ठेवल्यासही जनावरांना मधुमेह होतो. कुत्र्यांमध्ये ऑर्स्ट्रीलियन टेरियर, बिगल यांसारख्या परदेशी जातींच्या कुत्र्यात अनुवंशिक मधुमेह दिसतो. मधुमेह ओळखणे शक्‍य आहे, यात कुत्र्याची भूक वाढणे, पाणी जास्त पिणे, मूत्र विसर्जन सतत होणे. वजन कमी होणे, शरीरातील शुगर कमी झाल्याने किंवा वाढल्याने कुत्र्याला अशक्तपणा येतो.’’

प्राण्यातील मधुमेहावर असे आहेत उपाय

माणसाला जसे इन्शुलिन्स दिले जाते. त्याच प्रमाणे तीन प्रकारे जनावरांवरही उपचार होतात. यात इन्शुलिन्सशिवाय औषधे देणे तसेच आहारावरील नियंत्रण ठेवणे असे तीन प्रकारात उपचार केले जातात. मालकांनी जनावरांचे वयोमान व जातीनुसार वजन नियंत्रित ठेवावे. कमी जागेत जनावरांना सतत न बांधता त्यांना व्यायाम द्यावा, जनावरांना बेकरी उत्पादने, गोड पदार्थ, चॉकलेट, बर्फी, पेढा खायला देऊ नयेत किंवा फक्त घरच्या भाकरी न देता जनावारांचे पशुखाद्य (डॉग फूड) देणे अत्यावश्‍यक आहे. 

बैलांना कशामुळे होतो मधुमेह

बैलामध्ये मधुमेह दिसून येतो. ज्या बैलांना जास्तीजास्त फक्‍त उसाचे वाढे खाद्य म्हणून  दिले जाते, त्या बैलांना मधुमेह झाल्याचे दिसते. याशिवाय किडनी व स्वादुपिंडाच्या आजारामुळे बैलांना मधुमेह होतो. त्यांची लघवी साठते, भरपूर खाद्य खातो; पण वजन कमी होते. तेव्हा बैलांची शुगर तपासणी करून किडनीचे काम व्यवस्थित होते की नाही पाहावे लागते.

पशुच्या मधुमेहाचे दोन प्रकार

१. वयोमानानुसार स्वादुपिंडाचे काम कमी झाले की, स्वादुपिंडाकडून इन्शुलिन्स कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे मधुमेह होतो.  जनावरात नसला तरी खाण्या पिण्याच्या सवयी व व्यायामाच्या अभावामुळे जनावरात ही मधुमेह दिसतो.         
२. स्वादुपिंडात इन्शुलीन्स तयार होते; परंतु ते पेशीमध्ये शोषले जात नाही त्यामुळे रक्तातील शर्करा वाढते. हा मधुमेहाचा दुसरा प्रकार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How To Identify Diabetes In Dogs, Cats and Bulls