‘सोमनाथ’साठी ठराव होतो; ‘रामा’साठी कायदा का नाही? - हुकूमचंद सावला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

सांगली - श्रद्धेचा निर्णय न्यायालय करू शकत नाही. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ठराव नेहरुंचे मंत्रिमंडळ करू शकते, तर राममंदिर उभारणीसाठी सध्याचे केंद्र सरकार कायदा का करू शकत नाही, असा सवाल विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी येथे केला.

सांगली - श्रद्धेचा निर्णय न्यायालय करू शकत नाही. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ठराव नेहरुंचे मंत्रिमंडळ करू शकते, तर राममंदिर उभारणीसाठी सध्याचे केंद्र सरकार कायदा का करू शकत नाही, असा सवाल विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी येथे केला.

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकाजवळ झालेल्या विराट हिंदू हुंकार सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध मठ-संप्रदायाच्या साधू-संतांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राममंदिर उभारणीसाठी परिषदेच्या वतीने सुरू केलेल्या जनजागरण मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची ही सभा झाली. या सभेत येत्या राम नवमीला ‘चलो अयोध्या’चा संकल्प करण्यात आला.

१९९२ च्या बाबरी मशीद पाडावानंतर विश्‍व हिंदू परिषदेने प्रथमच देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू केले आहे. या आंदोलनाबद्दल माहिती नसलेल्या युवा पिढीसाठी सावला यांनी आज राममंदिर आंदोलनाची पार्श्‍वभूमी आणि इतिहास कथन केला.

ते म्हणाले, ‘‘अयोध्येत राममंदिर व्हावे, ही मागणी या देशातील प्रत्येक नमाजी मुस्लिमाची आहे. फक्त पाव टक्के राजकारणी मुस्लिमांचा त्याला विरोध आहे. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू होते. त्यांच्या मंत्रिमंडळाने जीर्णोद्धारासाठी ठराव केला होता. त्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री मौलाना आझाद होते. ’’

श्री सावला म्हणाले, ‘‘मुहंमद हवेत उडणाऱ्या घोड्यावरून मदिनेत आले. कुमारी मातेच्या पोटी येशूचा जन्म झाला, या धार्मिक मुस्लिम आणि ख्रिस्तींच्या श्रद्धेला कोणी आव्हान देऊ शकत नाही. तसेच राम अयोध्येत जन्मले हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेलाही. रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, हे न्यायालयाने मान्य केले आहे आणि तिथे मंदिर होते, याचे अनेक पुरावे पुरातत्त्व विभागानेही दिले आहेत. हा सारा इतिहास आजच्या नव्या पिढीला माहीत नाही. मुस्लिम धर्मात कोणा व्यक्तीच्या नावे मशीद असूच शकत नाही. त्यामुळे बाबराच्या नावाने मशीद कशी असू शकेल? जिथे मिनार नाही, जिथे नमाजींसाठी विहीर नाही, ती जागा मशीद असू शकत नाही. असे अनेक पुरावे यापूर्वी समोर आले आहेत.’’

क्षणचित्रे

  • क्रांतिसिंह पुतळ्यापासून उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस मुख्यालयाशेजारीच सभा झाली.
  • खासदार संजय पाटील, दीपकबाबा शिंदे-म्हैसाळकर, महापौर संगीता खोत यांच्यासह भाजप नेत्यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती
  • संघ परिवारातील विविध संस्थांमधील कार्यकर्ते, तसेच भाजप कार्यकर्त्यांची मोठी टीम सभेच्या संयोजनात गेले आठवडाभर व्यस्त होती.  
  • शहर व परिसरातून कार्यकर्त्यांचे जथ्थे भगव्या झेंड्यासह सभास्थळी उशिरापर्यंत दाखल होत होते.
  • हुंकार सभेसाठी शहरात फलक लावून मोठी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.

दिल्लीचा मार्ग अयोध्येतूनच
काँग्रेस पक्षाचा नामोल्लेख टाळून सावला यांनी टीका केली. प्रेक्षकांना हात उंचावून मंदिरासाठी संकल्प केल्यानंतर त्यांनी हात दाखवू नका कारण हातच सर्व समस्यांचे मूळ आहेत, अशी खिल्ली उडवली. आजवर दिल्लीला जाणारा रस्ता थेट होता, मात्र आता तो अयोध्येच्या मार्गे जातो, हे ओळखूनच आता मंदिराला विरोध करणारे मंदिर कधी होणार, हे प्रश्‍न विचारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. इथे बसलेल्या राजकारण्यांनी हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करण्यासही ते विसरले नाहीत.

Web Title: Hukumchand Chavala comment