खासगी सावकारांचा धुमाकूळ: शेकडो एकर जमिनी गिळंकृत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

मिरज तालुक्‍यातील बेळंकी येथे संजय कदम या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे मिरज पूर्व भागातील खासगी सावकारीचा फंडा पुन्हा एकदा सिद्ध झाला.

मिरज : तालुक्‍यातील बेळंकी येथे संजय कदम या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे मिरज पूर्व भागातील खासगी सावकारीचा फंडा पुन्हा एकदा सिद्ध झाला. पूर्व भागातील पारंपरिक पाणीटंचाई, अवकाळी पाऊस आणि लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी अशा अनेक संकटांचा अचूक लाभ घेत शहरातील खासगी सावकारांच्या टोळ्यांनी मिरज पूर्व भागात शेकडो एकर जमिनी गिळंकृत केल्या आहेत. बेळंकीच्या संजय कदम या शेतकऱ्याची आत्महत्या हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. गेल्या काही दशकांपासून सांगली, मिरज शहरातील तसेच काही कर्नाटकातील खासगी सावकारांच्या टोळ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा अचूक लाभ घेत जमिनी बळकावण्याचा सपाटाच लावला आहे.

यासाठी सावकारांनी स्थानिक पातळीवरील राजकीय गुंड आणि पोलिस यंत्रणेला सोबत घेतले आहे. शेतकऱ्याला जुजबी रक्कम भरमसाट व्याजाने देऊन "हलाल' पद्धतीने त्याला देशोधडीला लावण्याचे मोठे षडयंत्र या टोळीकडून रचले जाते. त्यासाठी कर्ज देताना या टोळ्या शेतकऱ्यांशी अतिशय गोड बोलतात आणि नंतर वसुलीसाठी अमानवी पद्धतीने शेतकऱ्याला छळायला सुरू करतात. शेतकऱ्याने एका सावकाराचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी लगेच दुसरा सावकार पुढे येतो. आणि तेथूनच सावकारांच्या छळवणुकीचा सिलसिला सुरू होतो. यामध्ये भरमसाट व्याजाची वसुली आणि जमीन बळकावण्यासाठीच्या प्रयत्नात गाव पातळीवरील राजकीय टगे आणि पोलिस यंत्रणेतील "वसुलीबहाद्दर' खासगी सावकाराच्या बाजूने समर्थपणे उभे राहतात.

यावेळी शेतकऱ्याची जमीन भरमसाट व्याजापोटी हडप करण्यासाठी शेतकऱ्याची समजूत काढण्यापासून ती मातीमोलाने विकत घेण्यापर्यंतच्या प्रत्येक प्रक्रियेत हे टगे आणि वसुली बहाद्दर पोलिसांचा खासगी सावकाराकडील मोबदला ठरलेला असतो. यासाठी प्रसंगी शेतकऱ्याला जीवानिशी मारण्याच्या धमकीपासून ते त्याच्या या कुटुंबाला वेठीस धरण्यापर्यंत अनेक हिंसक प्रकारे शेतकऱ्यास धमकावले जाते. संजय कदम याने वसुलीसाठी अजीज शेख हा खासगी सावकार ठाण मांडून बसला असतानाच घरातून पळून जाऊन स्वतःच्या शेतातच आत्महत्या केली आहे. या आत्महत्याप्रकरणी संजय कदम यांच्या पत्नीने जाहीरपणे वक्तव्य करूनही आणि तक्रार देऊनही मिरज ग्रामीण पोलिसांना खासगी सावकार अजिज शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार दिवसांनंतरचा मुहूर्त सापडतो आणि त्यानंतर त्याला अटक होते. हा पोलिस यंत्रणेचा हा निव्वळ दिखाऊपणा आहे. पूर्वभागातील गावागावात खासगी सावकारांच्या टोळ्या, त्यांना संरक्षण देणारे वसुली बहाद्दर पोलिस आणि राजकीय टगे यांच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांवरील अनन्वित अत्याचारांचे 

अनेक किस्से उघडपणे ऐकायला मिळतात. अनेक प्रकरणांत खासगी सावकारांच्या त्रासाने पिचलेले, देशोधडीस लागलेले शेतकरी पोलिस ठाण्यापर्यंत जाऊनही त्यांची फिर्याद घेण्याचीही तसदी पोलिस यंत्रणेने घेतलेले नाही. अनेक गावांमध्ये तर राजकीय टग्यांनीच सावकारीची दुकाने उघडून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. त्यामुळे गावागावातील खासगी सावकारीचा बीमोड करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सर्वप्रथम पोलिस यंत्रणेतील खासगी सावकारांचे हितचिंतक शोधून काढून त्यांच्याविरुद्धही कारवाया करणे गरजेचे आहे. अन्यथा अजिज शेखसारखे अनेक खासगी सावकार काही दिवसांकरता तुरुंगात राहून पुन्हा राजरोसपणे पोलिस संरक्षणातच खासगी सावकारीसाठी पर्यायाने कर्जबाजारी शेतकऱ्याचा बळी घेण्यासाठी पुन्हा सज्ज होणार आहेत. 

अन्यथा ही आत्महत्याही दप्तरबंद झाली असती

संजय कदम या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अटक केलेला खासगी सावकार अजिज शेख हा काही वर्षांपूर्वी इनाम धामणी आणि विश्रामबाग परिसरात जुन्या चारचाकी गाड्यांच्या विक्री व्यवहारात दलाली करायचा. त्याने काही वर्षांपूर्वी खाजगी सावकारी सुरू केली. त्याच्या सावकारीचा विस्तार इनाम धामणी ते सलगर या पट्ट्यात केवळ काही महिन्यात विस्ताराला.त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठीही सहजासहजी कोणी धजावत नाही. बेळंकीच्या कदम कुटुंबाच्या पाठीशी अनिल आमटवणे आणि अन्य पंचायत समिती सदस्य ठामपणे उभा राहिले. ज्यामुळे पूर्व भागातील खासगी सावकारी चव्हाट्यावर तरी आली.अन्यथा संजय कदमची आत्महत्याही दप्तरजमा झाली असती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of acres of land aquired by private moneylenders in the miraj