पत्नीच्या खुनाबद्दल पतीला शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सासरी नांदत नसल्याने कैलासच्या मनात राग होता. 17 सप्टेंबर 2015 रोजी हसनापूर (ता. राहाता) येथील नंदू राठी यांच्या शेतात खुरपणीसाठी शोभा पवार गेल्या होत्या.

कोपरगाव : पत्नी सासरी नांदत नसल्याच्या रागातून चाकूने वार करून तिचा खून केल्याबद्दल येथील सत्र न्यायालयाने तिचा पती कैलास रेवजी पवार यास 15 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शोभा कैलास पवार असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

हेही वाचा - नगरमध्ये काय घडलं छत्रपती-रामदासांबद्दल 

अधिक माहिती अशी : आरोपी कैलास पवार दररोज दारू पिऊन शोभा यांना मारहाण करीत असे. सततच्या त्रासाला कंटाळून शोभा यांनी पतीचे घर सोडले. सासरी नांदत नसल्याने कैलासच्या मनात राग होता. 17 सप्टेंबर 2015 रोजी हसनापूर (ता. राहाता) येथील नंदू राठी यांच्या शेतात खुरपणीसाठी शोभा पवार गेल्या होत्या. काही वेळाने तेथे दारू पिलेल्या अवस्थेत तिचा पती कैलासही आला. सर्वांदेखत त्याने पत्नी शोभा यांना शिवीगाळ केली. ओढत तो पत्नीला घरी घेऊन जात होता. त्यास विरोध केल्याने रागावलेल्या कैलासने शेतालगतच्या रस्त्यावरच खिशातून चाकू काढून तिच्यावर वार केले. त्यानंतर तो पळून गेला. 
चाकूने वार झाल्याने शोभा गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी नगरला जिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून त्यांना पुण्याला हलविण्यास सांगितले. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती पुण्याला जाऊ शकली नाही. पुढील उपचार न झाल्याने 2 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत राहाता पोलिसांनी कैलासविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

जाणून घ्या- बिबट्या कोणी मारीला 

राहाता न्यायालयातून हा खटला कोपरगाव येथील सत्र न्यायालयात वर्ग झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाने कैलास पवार यास 15 वर्षांची सक्तमजुरी व 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी बाजू मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband punishes wife for murder