पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

महाबळेश्‍वर - येथे पर्यटनासाठी आलेल्या पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर याच शस्त्राने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या केली. या दांपत्याच्या ११ वर्षांच्या मुलासमोरच काल मध्यरात्री एक वाजता हा प्रकार घडला.

महाबळेश्‍वर - येथे पर्यटनासाठी आलेल्या पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर याच शस्त्राने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या केली. या दांपत्याच्या ११ वर्षांच्या मुलासमोरच काल मध्यरात्री एक वाजता हा प्रकार घडला.

पती- पत्नीत भांडणाचे पर्यावसन या अघोरी प्रकारात झाले. हे दांपत्य पुणे येथील आहे. अनिल सुभाष शिंदे (वय ३४) व सीमा अनिल शिंदे (वय ३०, दोघेही रा. वडार सोसायटी ऑफिसजवळ, विश्रांतवाडी, धानोरी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. आदित्य अनिल शिंदे (वय ११) याच्यासमोर हा प्रकार घडला. अनिल हे पत्नी व मुलाबरोबर काल (ता. ५) महाबळेश्‍वरला फिरायला आले होते. सुभाष चौकाजवळील लॉजमध्ये त्यांनी राहण्यासाठी खोली घेतली होती. शहर व परिसरात थोडे फिरल्यानंतर रात्री जेवण करून सर्व जण रूमवर आले. रात्री एकच्या सुमारास महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. हॉटेलमधील व्यवस्थापक आणि मालक हे आवाजाच्या दिशेने धावले. आदित्यने रूमचा दरवाजा उघडला आणि समोरचे चित्र पाहताच दोघांच्या अंगाचा थरकाप उडाला. खोलीत शिंदे दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मालकाने आदित्यला बरोबर घेतले. त्यांनी तातडीने पोलिस ठाणे आणि रुग्णवाहिकेसाठी फोन केला. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले.   

घडलेल्या प्रकाराबाबत आदित्यने पोलिसांना माहिती दिली. रात्री एकच्या दरम्यान दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणातूनच रागाने अनिलने सीमाचा गळा चिरला. त्यांनी आरडाओरडा केल्याने आदित्य उठला आणि तो दोघांच्या भांडणात पडला. ‘आईला मारू नका’ अशी विनवणी त्याने वडिलांना केली; परंतु अनिल यांनी पत्नीच्या पोटावर व पाठीवर धारधार शस्त्राने सपासप वार केले. रागाच्या भरात त्याने पत्नीवर २५ पेक्षाही अधिक ठिकाणी वार केले. 

नातवाला पाहून आजीच्या भावना अनावर
मुलीचा खून झाल्याची माहिती मिळताच सीमाच्या आई काही नात्यातील महिलांबरोबर महाबळेश्‍वर येथे आल्या. पोलिस ठाण्यात आपला नातू आदित्य याला पाहून रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. आजीने नातवाला जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरविला. आजी आणि नातवाच्या भेटीने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.

Web Title: Husband's suicide by killing his wife in mahabaleshwar