सिलिंडरच्या स्फोटात झोपडी जळून खाक; आग विझवायला पाणीच नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

भल्या सकाळी झोपेत असतानाच छपराला आग लागली. काही कळायच्या आत शेजारील महिलेने झोपेतून जागे करत झोपडीच्या दरवाजातून बाहेर काढले अन्‌ आधीच मोडका असलेला संसार जळत राहिला. दुष्काळीस्थितीत आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी संसाराची राखरांगोळी बघण्याची दुर्दैवी वेळ त्या ज्येष्ठ निराधार महिलेवर ओढवली.

नगर : भल्या सकाळी झोपेत असतानाच छपराला आग लागली. काही कळायच्या आत शेजारील महिलेने झोपेतून जागे करत झोपडीच्या दरवाजातून बाहेर काढले अन्‌ आधीच मोडका असलेला संसार जळत राहिला. दुष्काळीस्थितीत आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी संसाराची राखरांगोळी बघण्याची दुर्दैवी वेळ त्या ज्येष्ठ निराधार महिलेवर ओढवली. कापूरवाडी (ता. नगर) येथील दत्तवाडीत आज सकाळी पावणेसात वाजता ही घटना घडली. 

पेटलेल्या झोपडीकडे परिसरातील अनेकांनी धाव घेतली. मात्र, पाणीच नसल्याने ही आग आटोक्‍यात कशी आणायची, हा प्रश्‍न अखेरपर्यंत सुटलाच नाही. त्यात सर्वांनाच नाईलाज झाला अन्‌ त्या आगीत सीताबाई गंगा कराळे (वय : 65) या ज्येष्ठ महिलेच्या संसाराची राख झाली. संसारपयोगी साहित्य, कपडे, मोलमजुरी व भाजीपाला विकून जमविलेले पैसे, धान्य आगीत भस्मसात झाले. भांडीही काळवंडली. 

सकाळी पावणेसात वाजता सीताबाई झोपेतच होत्या. त्या वेळी त्यांच्या झोपडीला आग लागली होती. शेजारी राहणाऱ्या विठाबाई केशव कराळे (वय : 57) या घराबाहेर आल्या असता त्यांना सिताबाई यांच्या झोपडीला आग लागल्याचे निदर्शनास आले. जाळ निघत असल्याने त्यांनी सीताबाई यांच्या झोपडीकडे धाव घेतली. सीताबाई यांना त्यांनी तातडीने झोपेतून जागे करत पुढील दरवाजातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण करत झोपडीची राखरांगोळी केली. 

सीताबाई यांच्या झोपडीला लागलेल्या आगीची झळ शेजारच्या घरांनाही बसली. त्यात अशोक कराळे, पांडुरंग दुसुंगे व रामदास गाडगे यांच्या घराच्या खिडक्‍यांच्या काचा तडकल्या. वाहनांच्या काचाही फुटल्या. तसेच झोपडीच्या शेजारीच असलेली केशव मुरलीधर कराळे यांची चार हजार वैरण जळून खाक झाली. ऐन दुष्काळात चारा टंचाईच्या काळात बसलेला हा मोठा फटका आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सीताबाई यांनी नुकतेच गॅस सिलेंडर घेतले होते. तथापि, ते लिकेज असल्याची तक्रार त्यांनी केली होती. ते सिलेंडर आज त्यांना बदलून मिळणार होते. त्या अगोदरच आज ही घटना घडल्याचे त्यांचे शेजारी जालींदर केशव कराळे यांनी सांगितले. सीताबाई यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुळबाळ नसल्याने त्या एकट्याच राहतात. मोलमजुरी व भाजीपाला विकून त्या स्वत:चा संसार चालवतात. मात्र, आज लागलेल्या आगीत त्यांचा मोडका-तोडका संसारही जळून खाक झाल्याने त्यांच्यापुढे जगण्याचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: hut burned in Cylinder bomb blast in nagar