राजकारणातून संन्यास नाही - प्रकाश आवाडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

यंत्रमाग उद्योगाकडे व कामगारांकडे या शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
त्यांची फसवणूक झाली  आहे. त्यांना योग्य न्याय मिळायला हवा.
- प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योगमंत्री 

इचलकरंजी - ‘‘सध्या आपण सक्रिय राजकारणापासून जरा अलिप्त आहे. याचा अर्थ राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. लवकरच पूर्वीप्रमाणे आक्रमक होणार आहे; पण त्याला अद्याप जरा वेळ आहे, असे स्पष्टीकरण माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी आज येथे दिले.

येथील पत्रकार कक्षामध्ये माजी मंत्री आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना वस्त्रोद्योग, शहराचा विकास, राजकारण आदी विषयांवर त्यांनी रोखठोक मते मांडली. यंत्रमाग उद्योगाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप त्यांनी याप्रसंगी केला. या वेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, काँग्रेसचे पालिकेतील पक्षप्रतोद सुनील पाटील यांची उपस्थिती होती.

यंत्रमाग उद्योगासाठीच्या कर्जावरील व्याज सवलतीचा व सवलतीच्या वीज दराचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची शिफारस माझ्या कारकिर्दीत झाली होती, पण आता असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ शासनाकडून स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे यंत्रमाग कामगारांची फसवणूक झाल्याचाच प्रकार आहे. त्यांना यामुळे योग्य न्याय मिळणार नाही, अशी खंत श्री. आवाडे यांनी या वेळी व्यक्त केली. यंत्रमाग उद्योगाकडे व कामगारांकडे या शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, असे मत श्री. आवाडे यांनी मांडले. आपल्या काळात मंजूर झालेली घरकुले नंतर रद्द झाली. वारणा नळपाणी योजना दोन वर्षांपूर्वी झाली असती, पण राजकारण आडवे आले आणि विरोधकांनी काळम्मावाडीचा विषय आणला. त्याला आम्ही पाठिंबा दिला; पण आता वारणा योजना ही मार्गी लागली नाही. कृष्णा योजनेसाठी आलेला निधी परत गेला. हा निधी परत पाठविण्याचे कारणच काय, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. 

इचलकरंजी शहराला शटललेस लूमची सिटी तयार करण्याचे काम माझ्या कार्यकाळात झाले. आजही मी वस्त्रोद्योग मोठा करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करीत आहे.

Web Title: ichalkaranji kolhapur news politics prakash awade