इचलकरंजीत दगडफेक, वाहनांची मोडतोड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

इचलकरंजी - शहापूर येथील बालाजीनगरमध्ये प्रार्थनास्थळाची संरक्षण भिंत आज अज्ञात व्यक्तीने पाडली. यामुळे संतप्त झालेल्या एका गटाने शहरातील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. डेक्कन चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी बालाजीनगरातील काही घरे, बंगल्यांवर दगडफेक केली. त्यानंतर बालाजीनगरातील नागरिकांनीही शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

इचलकरंजी - शहापूर येथील बालाजीनगरमध्ये प्रार्थनास्थळाची संरक्षण भिंत आज अज्ञात व्यक्तीने पाडली. यामुळे संतप्त झालेल्या एका गटाने शहरातील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. डेक्कन चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी बालाजीनगरातील काही घरे, बंगल्यांवर दगडफेक केली. त्यानंतर बालाजीनगरातील नागरिकांनीही शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. 

बालाजीनगरामध्ये एका गटाच्या पाच लोकांनी सामाईक जागा खरेदी करून त्यावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा घाट घातला आहे. त्यांनी ते उभारण्यापूर्वी शासनाच्या विविध कार्यालयांची परवानगी घेणे गरजेचे होते; पण तसे त्यांनी केले नाही. दुसऱ्या गटाच्या लोकांनी या बांधकामावर हरकत घेतली. नगरपालिकेकडे रितसर तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रार्थनास्थळाचे बांधकाम तातडीने थांबवले. संबंधितांना नोटीसही जारी केली. त्यामुळे हे बांधकाम काही महिन्यांपासून बंद होते. दरम्यान, कोणतेही कायदेशिर सोपस्कार पूर्ण न करताच काल पुन्हा हे बांधकाम सुरू करण्यात आले. दुसऱ्या गटाने त्यावर हरकत घेत ते पुन्हा बंद पाडले. याच दरम्यान, या प्रार्थनास्थळाची संरक्षक भिंत कोणीतरी पाडली. हा प्रकार उघडकीस येताच प्रार्थनास्थळाच्या ट्रस्टींसह त्यांच्या समर्थकांनी काल रात्री शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. संरक्षक भिंत पाडणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी तक्रार अर्ज द्या. त्यांची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. 

काल रात्री उशिरा घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल केला नाही. या कारणावरून प्रार्थनास्थळाच्या ट्रस्टींसह त्यांच्या समर्थकांनी आज सकाळी शहरातील सुंदर बागेसमोरील अपर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. कार्यालयासमोर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी प्रार्थनास्थळाच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली. संरक्षण भिंत पाडणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे ट्रस्टींसह त्यांचे समर्थक तेथून बाहेर पडले. 

याच दरम्यान त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील स्टेशन रोडवरील डेक्कन चौकात अचानक रास्ता रोको सुरू केले. यांची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सतीश पवार, सीताराम डुबल, मनोहर रानमाळे आदी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही अतिउत्साही कार्यकर्ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊ लागले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांसह रास्ता रोको करणाऱ्यांवर लाठीमार केला. आंदोलकांची धरपकडही सुरू केली. आंदोलकांची पळापळ झाली. या घटनेमुळे चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे या चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले. 

याच दरम्यान आंदोलकांतील काहींनी बालाजीनगरातील घरे, बंगल्यांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत घरांचे, बंगल्यांचे नुकसान झाले. रस्त्याकडेला लावलेली आलिशान मोटार, रिक्षा, मोटारसायकलींवरही त्यांनी दगडफेक केली. याची माहिती समजताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. त्यांची चाहुल लागताच आंदोलक पळून गेले. या प्रकाराने भयभीत होऊन नागरिकांनी घराची व बंगल्यांची दारे लावून स्वत:ला कोंडून घेतले होते. पोलिस बालाजीनगरात येताच नागरिकांनी त्यांना घेराओ घातला. दगडफेक करणाऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. आंदोलक पळून जात असताना त्यांच्यातील एकाची मोटारसायकल तेथील मोठ्या गटारीत पडली होती. काही महिलांनी ती पोलिसांना दाखवली. पोलिसांनी ती जप्त केली. त्याच्या नंबरवरून संबंधित हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. 

बालाजीनगरात दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी दुपारी तीनच्या सुमारास शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. तेथे धरणे आंदोलनही केले. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घरे, बंगल्यांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा तपास सुरू आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिले. बालाजीनगरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. 

डॉ. बारी परिस्थितीवर लक्ष ठेवून 

प्रार्थनास्थळाची संरक्षण भिंत पाडल्याच्या कारणावरून बालाजीनगरात जी घटना घडली तिचे पडसाद इचलकरंजीसह उपनगरांत उमटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यांची दक्षता घेऊन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ते स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

एक जण पोलिस ताब्यात 

या प्रकरणावर चर्चेतून मार्ग काढण्याचा पोलिस प्रयत्न करीत असतानाच रस्त्यावर एकजण तरुणांना चिथावणी देऊन त्यांना रास्ता रोको आंदोलन करायला भाग पाडत होता. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही त्याने केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अलीकडेच त्याने एका राजकीय पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. 

शांतता बिघडविण्याऱ्यांवर गुन्हे 
सतत अशांत असणारी इचलकरंजी सहा महिन्यांपासून शांत आहे. या शांततेला बाधा आणून शहर व उपनगरांत अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्यांची नावे निष्पन्न होताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत पोलिस यंत्रणेने अतिशय सतर्कपणे तपास सुरू ठेवला आहे.

Web Title: Ichalkaranji stones at vehicles of debris