Ichalkaranji News : इचलकरंजी पाणी पुरवठा करणारी योजना सील; थकबाकीसाठी पाटबंधारे विभागाची कारवाई

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणा-या कृष्णा योजनेच्या मजरेवाडी येथील उपसा केंद्राला सील ठोकण्यात आले आहे.
Ichalkaranji Water Supply Scheme Sealed
Ichalkaranji Water Supply Scheme Sealedsakal

इचलकरंजी - इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणा-या कृष्णा योजनेच्या मजरेवाडी येथील उपसा केंद्राला सील ठोकण्यात आले आहे. सुमारे १० कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी सांगली पाटबंधारे विभागांने ही कारवाई केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आल्यामुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

यातून मार्ग काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते. अखेर थकबाकीपोटी २७ लाखांचा भरणा करीत असल्याचे महापालिकेने कळविल्यानंतर उद्या (शुक्रवार) सकाळी १० वाजता सील काढण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३५ एमएलडी इतके पाणी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातून केले जाते. दरवर्षी त्यापोटी पाटबंधारे विभागाकडून सुमारे चार ते साडेचार कोटी इतके शुल्क आकारणी केली जाते. मात्र महापालिकेकडून वेळेत त्याचा भरणा न केल्यामुळे रक्कम थकीत गेली आहे. यामागे तांत्रिक कारण असल्याचेही महापालिका प्रशासनाचे मत आहे.

३१ मार्च जवळ आल्यामुळे पाटबंधारे विभागांने धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार एक पथक महापालिकेत दोन दिवसांपूर्वी आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत नुकतेच ७ लाख रुपये देण्यात आले असून येत्या मार्च अखेर कांहीतरी रक्कम देण्याची हमी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती.

मात्र आज अचानक सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी मजरेवाडी उपसा केंद्रावर धडक दिली. नृसिंहवाडी विभागाचे शाखाधिकारी आर.सी. दानोळे यांच्या पथकांने पाणी उपसा बंद करीत उपसा केंद्रातील पंपींग मशिनरीला सील ठोकले. पूर्वपरवानगीशिवाय सील काढल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटीसही मशिनरीवर चिकटविण्यात आली.

आकस्मीक कारवाईमुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता देवकर यांच्याशी संपर्क साधून २७ लाखांचा ऑनलाईन बँकींग सुविधाव्दारे तातडीने भरणा करीत असल्याचे कळविले. तसेच आणखी कांही रक्कम मार्च अखेर पर्यंत देण्याची हमी दिली. या कार्यवाहीनंतर पाटबंधारे विभागांने नरमाईची भूमिका घेत उद्या (शुक्रवार) सकाळी १० वाजता सील काढण्यात येईल, असे सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com