'अपंगांचा निधी खात्यावर वर्ग करा अन्यथा आंदोलन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

"प्रहार' करणार आयुक्तांच्या घरासमोर चटणी-भाकरी आंदोलन

कोल्हापूर - महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी अपंगांचा तीन टक्के निधी शासन निर्णयानुसार रोख अपंगांच्या खात्यावर वर्ग करावा; अन्यथा दिवाळीत आयुक्तांच्या निवासस्थानावर अपंगांतर्फे चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ""केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी समान संधी, संरक्षण, समान सहभाग कायदा 1995 हा एक जानेवारी 1996 पासून लागू केला. कायद्यातील कलम 40 अन्वये सर्व नागरी, स्थानिक स्वराज संस्थांनी अपंगांसाठी तीन टक्के निधी खर्च करण्याबाबत निर्देश दिले. निधी खर्चासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या. तसेच हा निधी अपंगांच्या मागणीनुसार उदरनिर्वाह, व्यवसाय, साहित्य खरेदी करता थेट लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात एनईएफटी / आरटीजीएसद्वारे जमा करावा, अशी सूचना असूनही कोल्हापूर महापालिकेने हा निधी खर्च केलेला नाही. हा निधी रोख स्वरूपात मिळावा म्हणून अर्ज केले असतानाही केवळ वस्तू किंवा साहित्य देण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. 23 ऑक्‍टोबरला महापालिकेने पुन्हा साहित्य वाटपाची जाहिरात काढली. यास आमचा विरोध असून रोख तीन टक्के निधी त्वरित बॅंक खात्यावर जमा करावा; अन्यथा दिवाळीत आयुक्त, महापौरांच्या निवासस्थानावर आंदोलन करणार आहोत.'' संदीप दळवी, संजय जाधव, शैलेश सातपुते, प्रशांत म्हेतर, शर्मिली इनामदार, शाबेरा मुजावर, रंजना गुलाईकर, राजेंद्र भोईटे, नरेश कांबळे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Web Title: If fund for Physically disabled not transfered then agiation started