गटबाजीचे "ग्रहण' सुटले तरच सोलापूरकरांसाठी "सुवर्णकाळ'

solapur
solapur

सोलापूर : सुविधांबाबत एकेकाळी राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर महापालिकेने दुहेरी संख्येवर उडी मारली आहे. स्थापनेनंतरच्या 54 वर्षांत शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हे कमी की काय म्हणून सध्या सत्ताधारी असलेल्या भाजपला "गटबाजी'चे ग्रहण लागले आहे. ते सुटल्यावरच सोलापूरकरांना खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ अनुभवता येणार असून, स्मार्ट सिटी प्रकल्प मृगजळ ठरणार नाही, यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. 

आज  (शुक्रवारी) अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थादिन आहे. त्यानिमित्त सोलापूर महापालिकेची सद्यःस्थिती, भविष्यातील गरजा याबाबत घेतलेला हा आढावा. शहराची तीन वेळा हद्दवाढ झाली. मात्र, निधीअभावी या परिसराचा विकास होऊ शकला नाही. सर्वांत मोठी हद्दवाढ 1992मध्ये झाली. त्यालाही 25 वर्षे झाली आहेत. इतक्‍या कालावधीनंतरही अजून या भागातील नागरिक ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अडचणी येत आहेत. शहराच्या विकासासाठी तयार करण्यात आलेले कृती आराखडे फक्त कागदांवर न राहता, त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. तरच, किमान मूलभूत सुविधा देण्यात पालिका प्रशासनाला यश येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था दिन खरोखर साजरा होईल. 

हद्दवाढ भागातील नागरिक सुविधांपासून वंचित 
लाखो रुपयांचा कर भरूनही हद्दवाढ भागातील नागरिक आजही सुविधांपासून वंचित आहेत. विशेष बाब म्हणजे, हद्दवाढ भागाच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. मात्र, त्याचे पुढे काय होते, हे कुणालाच समजत नाही. पैसे मंजूर झाल्याची घोषणा होते. प्रस्ताव चर्चेला येतात. मंजूरही होतात. मात्र, त्याचे पुढे काय होते, याचा पाठपुरावा कुणीही करीत नाही. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था दिनाचे औचित्य साधून, येत्या वर्षभरात शहराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार कार्यवाही ठेवण्याची शपथ पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घेतली, तर निश्‍चितच शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. महापालिका स्थापन झाल्यावर शहराचे क्षेत्रफळ फक्त 33 चौरस किलोमीटर होते. ते 179 चौरस किलोमीटरवर गेले आहे. मिळकती वाढल्या, लोकसंख्या वाढली, नगरे वाढली, सुविधा मात्र अपेक्षित प्रमाणात झाल्या नाहीत. 

सोलापूरकरांचा अपेक्षाभंग 
कॉंग्रेसच्या ४० वर्षांच्या  कारभाराला कंटाळलेल्या सोलापूरकरांनी भाजपच्या पदरात मोठ्या प्रमाणात मतांचे दान टाकून एकहाती सत्ता  दिली. त्याचा उपयोग करून सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होणे आवश्‍यक होते. मात्र, सहकारमंत्री आणि पालकमंत्री यांच्या समर्थकातील  गटबाजीने शहराचा विकास खुंटला आहे. विकास आराखडा प्रलंबित आहे; उड्डाणपूल सध्या तरी कागदावरच आहे, स्मार्ट सिटीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. शहर विकासाच्या प्रस्तावांसाठी पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांना कोणता मक्ता कोणाला द्यायला हवा यातच जास्त रस असल्याचे दिसून येते. त्यामुळे सामान्य सोलापूरकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com