मूळ कागदपत्रे अडवून ठेवल्यास कारवाई

शीतलकुमार कांबळे
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

सोलापूर - महाविद्यालयात प्रवेशावेळी विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी जाऊ नये म्हणून त्याची कागदपत्रे अडवून ठेवण्याचा प्रकार महाविद्यालयांकडून केला जातो. अशा प्रकारचे कृत्य केल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना दिला.

सोलापूर - महाविद्यालयात प्रवेशावेळी विद्यार्थी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी जाऊ नये म्हणून त्याची कागदपत्रे अडवून ठेवण्याचा प्रकार महाविद्यालयांकडून केला जातो. अशा प्रकारचे कृत्य केल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना दिला.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते, यामुळे विद्यार्थ्याला इतर पर्यायांचा विचार करता येत नाही. प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका, शाळेचा दाखला व अन्य संबंधित प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती न घेता, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून पुन्हा ती विद्यार्थ्यांच्या स्वाधीन करावीत. मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती महाविद्यालयाने स्वतःकडे ठेवाव्यात, अशा सूचना यूजीसीने केल्या आहेत.

माहिती पुस्तिकेची सक्ती नको
प्रवेशावेळी महाविद्यालयाचे प्रॉस्पेक्‍ट्‌स (माहिती पुस्तिका) घेण्याची सक्ती केली जाते. शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत या माहिती पुस्तकेची किंमत असते. ही माहिती पुस्तिका न घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जही दिला जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांची पर्यायाने पालकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. हे टाळण्यासाठी माहिती पुस्तिका घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करू नका, अशा स्पष्ट सूचना यूजीसीने केल्या.

प्रवेश रद्द केल्यास मिळेल फी परतावा
विद्यार्थ्याने घेतलेला प्रवेश रद्द केल्यास त्याला परतावा दिला जात नाही. आपल्याच महाविद्यालयात त्याने प्रवेश घ्यावा या मानसिकतेतून विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महाविद्यालयांकडून केला जातो. यावर उपाय म्हणून यूजीसीने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार प्रवेशाच्या अंतिम तारखेच्या पंधरा दिवसाआधी आपला प्रवेश रद्द केल्यास 100 टक्के परतावा मिळणार आहे. प्रवेशाच्या अंतिम तारखेनंतर पंधरा दिवसांत प्रवेश रद्द केल्यास 80 टक्के परतावा द्यावा लागणार आहेत. तर, प्रवेशाच्या अंतिम तारखेच्या पंधरा दिवसानंतर व 30 दिवसांच्या आत प्रवेश रद्द केल्यास 50 टक्के परतावा मिळेल.

Web Title: If the original documents falsely action

टॅग्स