जादा दराने भाजीपाला विकला तर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली-संचारबंदीच्या काळात महापालिका क्षेत्रात परवानगी दिलेल्या व्यापाऱ्यांनी बाजार भावापेक्षा जादा दराने भाजीपाला विकल्यास परवाने रद्द केले जातील. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. 

सांगली-संचारबंदीच्या काळात महापालिका क्षेत्रात परवानगी दिलेल्या व्यापाऱ्यांनी बाजार भावापेक्षा जादा दराने भाजीपाला विकल्यास परवाने रद्द केले जातील. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. 

"कोरोना' चा संसर्ग वाढल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये म्हणून भाजीपाला विक्रेता संघटनेने आठवडा बाजार बंद प्रथम बंद केले. त्यामुळे सांगलीतील शिवाजी मंडई, पेठभाग भाजी मंडई तसेच मिरजेतील बाजारात गर्दी होऊ लागली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा सर्व प्रकार पाहून आयुक्त नितीन कापडणीस यांनी दुसऱ्या टप्प्यात तिन्ही शहरात 18 ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेथेही गर्दी होऊ लागल्यामुळे एका दिवसातच ही भाजीपाला केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरपोहोच भाजीपाला व किराणा माल दिला जाईल असे जाहीर केले. 

भाजीपाला आणि किराणा माल घर पोहोच करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार आजपासून अनेक भागात घर पोहोच भाजीपाला आणि किराणा माल दिला जाऊ लागला आहे. परंतू अद्यापही बऱ्याच भागातील ग्राहकांना विक्रेत्यांच्या अडचणीमुळे घरपोहोच भाजीपाला व माल मिळाला नाही. त्याबद्दल सोशल मिडियावरून आयुक्तांकडे तक्रारी केल्या जात आहे. घरपोहोच भाजीपाला व किराणा माल देण्याच्या पद्धतीमध्ये आणखी सुसूत्रता आणण्याची मागणी होत आहे. 

दरम्यान घरपोहोच भाजीपाला विक्री करण्यासाठी महापालिकेने परवाने दिलेल्या काही व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जादा दराने भाजीपाला विकण्यास सुरवात केली आहे. त्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी संबंधित व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. जादा दराने भाजीपाला विकल्यास परवाने रद्द केले जातील तसेच गुन्हा दाखल केला जाईल. यापुढेही व्यापाऱ्यांनी जादा दराने विक्री केल्यास संबंधित व्यापाऱ्याची तक्रार महापालिकेकडे करावी असे आवाहनही श्री. कापडणीस यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the vegetable is sold at a higher rate, a crime will be registered