राधानगरी तालुक्यात साडेचार लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

  • न्यू करंजे (ता. राधानगरी) येथे बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेंपो पकडला.
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई. 
  • भंगार साहित्यामागे लपवलेल्या साडेचार लाखांहून अधिकचे मद्याचे बॉक्‍स जप्त.  
  • अटक केलल्या संशयितांची नांवे - राजन नारायण नाईक (वय 40, सावंतवाडी, खासकीलवाडा) आणि शिवराम विश्‍वनाथ हळदणकर (वय 30, रा. चराटा, शिल्पग्राम सावंतवाडी, सिंधूदुर्ग). 

कोल्हापूर - न्यू करंजे (ता. राधानगरी) येथे बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणाऱ्या टेंपो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडला. भंगार साहित्यामागे लपवलेल्या साडेचार लाखांहून अधिकचे मद्याचे बॉक्‍स पथकाने जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक केली. 

अटक केलल्या संशयितांची नांवे - राजन नारायण नाईक (वय 40, सावंतवाडी, खासकीलवाडा) आणि शिवराम विश्‍वनाथ हळदणकर (वय 30, रा. चराटा, शिल्पग्राम सावंतवाडी, सिंधूदुर्ग) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती, कोल्हापूर जिल्हा भरारी पथकास फोंडा ते राधानगरी मार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काल रात्री पासून पथकाने या मार्गावर सापळा रचला. पहाटेच्या सुमारास न्यू करंजे (रा. राधानगरी) गावच्या हद्दीतून एक टेंपो जात होता. तो पथकाने थांबवला. याबाबत चालकाला टेंपोत काय आहे, याची विचारणा केली. त्यावेळी त्याने रिकाम्या प्लॅस्टीकच्या बाटल्या भरलेल्या गोण्या असल्याचे पथकाला सांगितले. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी वाहनातील भंगाराच्या सर्व गोण्या खाली उतरवल्या. त्याच्या मागे लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या मद्याचे 60 बॉक्‍स पथकाला मिळून आले. ते त्यांनी टेंपोसह जप्त केले.

टेंपोतील चालकासह दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली नावे राजन नाईक व शिवराम हळदणकर असल्याचे सांगितले. त्यांना अटक केली. कारवाईत पथकाने 4 लाख 56 हजाराचा मद्यसाठासह टेंपो मोबाईल असा एकूण 7 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, कर्मचारी संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seized in Radhanagari taluk