चंदगड तालुक्यात चार लाख 81 हजारांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

  •  इसापूर ( ता. चंदगड) परिसरातून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या टेंपोवर कारवाई 
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी दोघांना घेतले ताब्यात. 
  • विश्‍वनाथ आनंदा रायकर (वय 30,रा. शिप्पूर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज), संभाजी शिवाजी साबळे (वय 30, रा. दाटे, चंदगड) अशी त्या संशयितांची नांवे. 
  • त्यांच्याकडून 4 लाख 81 हजाराचा मद्यसाठा जप्त. 
  • या घटनेत अंधाराचा फायदा घेत दोघेजण पसार. सतिश अर्दाळकर (रा. अडकूर, ता. चंदगड) आणि सुभाष मुसळे (रा. अडकूर पैकी उत्साळी, चंदगड) अशी त्यांची नावे 

कोल्हापूर -  इसापूर ( ता. चंदगड) परिसरातून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा टेंपो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करून पकडला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. विश्‍वनाथ आनंदा रायकर (वय 30,रा. शिप्पूर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज), संभाजी शिवाजी साबळे (वय 30, रा. दाटे, चंदगड) अशी त्या संशयितांची नांवे आहेत. . त्यांच्याकडून 4 लाख 81 हजाराचा मद्यसाठा जप्त केला. दरम्यान अंधाराचा फायदा घेत दोघेजण पसार झाले. सतिश अर्दाळकर (रा. अडकूर, ता. चंदगड) आणि सुभाष मुसळे (रा. अडकूर पैकी उत्साळी, चंदगड) अशी त्यांची नावे आहेत.  यांचा पथकाने शोध सुरू केला आहे.

याबाबत विभागाने दिलेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकास चौकुळ - इसापूर - हेरे (ता. चंदगड) मार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास इसापूर गावामध्ये तैनात असणाऱ्या पथकास चौकुळ गावाकडून एक टेंपो संशयास्पदरित्या जाताना दिसला. पथकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा टेंपो चालकाने थांबवला नाही. तो त्याने किल्ले पारगडच्या दिशेने नेला. त्याचा पथकाने पाठलाग सुरू केला.

दरम्यान पारगड फाट्यावर दुसऱ्या पथकाने तो टेंपो अडवला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन त्यातील दोघे जण पसार झाले. मात्र त्यातील संशयित विश्‍वनाथ रायकर आणि संभाजी साबळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पथकाने त्या टेंपोची तपासणी केली. त्यात एक प्लॅस्टिक कागद अंथरला होता. त्याखाली गोवा बनावटीच्या मद्याचे 76 बॉक्‍स पथकाच्या हाती लागले. त्याची किमंत 4 लाख 81 हजार 440 रूपये इतकी आहे. पथकाने 2 लाख 61 हजार रूपये किमंतीचा टेंपा असा 7 लाख 42 हजार 440 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illigal wine seized in Chandgad Taluka