
मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांमधील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मिरज : मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांमधील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी करणारे निवेदन मिरज पंचायत समितीचे सभापती अनिल आमटवणे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दुष्काळी तालुक्यांमधुन येत्या काही दिवसांत टॅंकरची मागणी होणार आहे. विहिरी, नाले, ओढे आटू लागल्याने जनावराच्यां पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या पाण्याची येत्या काही दिवसांत नितांत गरज भासणार असल्याचे यावेळी आमटवणे यांनी सांगितले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, 81ः19 या प्रमाणाप्रमाणे पूर्व भागातील शेतकरी पाण्याचे पैसे भरण्यास तयार आहेत. या पैशाची वसुली करून यंत्रसामग्रीची किरकोळ दुरुस्ती करण्यासह येथील अन्य कामे करण्यास वेळ लागणार असल्याने ही योजना सुरू होण्यास किमान आठ ते दहा दिवस लागतील. त्यामुळे आत्तापासूनच पाणीपट्टी वसूल करण्यासह किरकोळ दुरुस्तीची कामे जलसंपदा विभागाने करावीत.
सध्या दुष्काळी टप्प्यातील अनेक गावांमध्ये जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे तातडीने ही योजना सुरू करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी. हे निवेदन देताना पंचायत समितीचे सदस्य कृष्णदेव कांबळे, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, वसंतराव गायकवाड, प्रदीप सावंत, खंडेराव जगताप आदी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार