बेळगाव शहरात कोरोना पाठोपाठ नागरिकांमध्ये 'या' आजाराची भिती...

मिलिंद देसाई
Tuesday, 21 July 2020

डेंग्युमुळे काही जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बेळगाव - मजगाव, वडगाव, शहापूरनंतर आता झटपट कॉलनी, कुरबुर गल्ली अनगोळ भागात डेंग्युच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या भितीखाली असलेल्या शहरवाशीयांना डेंग्युची भितीही वाटु लागली असुन आरोग्य विभागाने याकडे त्वरीत लक्ष देणे आवश्‍यक आहे. अन्यथा डेंग्युच्या रुग्णात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

काही दिवसांपुर्वी नाथ पै सर्कल येथील चांभारवाडा येथे तब्बल 11 जणांना डेंगीची लागण झाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तेथील रुग्णांची संख्या कमी होत असताना आता झडपट कॉलनी व कुरबुर गल्ली येथे डेंग्युमुळे काही जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील सर्व गटारी कचऱ्याने भरुन गेल्या आहेत. त्यामुळे गटारीत पाणी साचुन राहीत आहे. त्यामुळेच परिसरात डेंग्युच्या रुग्णात वाढ होत आहे असा आरोप येथील नागरीकांमधुन होत असुन आरोग्य विभाग व महापालिकेची यंत्रणा सध्या फक्‍त कोरोना नियंत्रणात व्यस्त असल्याचे सांगत आहे. त्यामुळे इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहविाशांमधुन संताप व्यक्‍त होत आहे.

वाचा - हातकणंगले परिसरात 'ही' तल्लफ भागवण्यासाठी पहाटेपासूनच केली जातेय गर्दी...

विष्णू गल्ली, वडगावातील 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्यासह मजगाव येथील दोन जणांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिका व आरोग्य विभागाने डेंग्युबाबत अधिक प्रमाणात खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळेच शहर व उपनगर परिसरात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. अनगोळ परिसरातील डेंग्यु झालेले रुग्ण सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कचऱ्याची उचल, गटार स्वच्छता वेळेवर केली जात नसल्यामुळे येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळेच रुग्ण वाढत असतानाही या भागात औषध फवारणीचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका व आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.
 

दोन प्रभागांना मिळुन एकच वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच घरोघरी जाऊन कचरा उचल केली जात नाही त्यामुळे दररोज फक्‍त 50 टक्‍केच कचऱ्याची उचल होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे आवश्‍यक आहे.
- विनायक गुंजटकर, माजी नगरसेवक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase dengue patients in belgum