श्रीविठ्ठला चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या देणगीत तब्बल दीड कोटींची वाढ

अभय जोशी
शनिवार, 20 जुलै 2019

- गेल्या वर्षीच्या उत्पन्नात यंदा तब्बल एक कोटी 50 लाखांची विक्रमी वाढ.

पंढरपूर : गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीविठ्ठलाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या देणगीत दरवर्षी मोठी वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रा काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ४ कोटी 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पन्नात यंदा तब्बल १ कोटी ५० लाखांची विक्रमी वाढ झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी यात्रा काळात दर वर्षी मंदिर समितीच्या वतीने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष  डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा देखील मंदिर समितीने चांगले नियोजन केले होते. आषाढी यात्रेत वारकरी भाविकां कडून ३ जुलै ते १७  जुलै या पंधरा दिवसात विविध माध्यमातून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पन्नात तब्बल १ कोटी ५० लाखांची विक्रमी वाढ झाली आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे ७ लाख २८ हजार इतक्या भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

श्री विठ्ठलाच्या चरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दान तर श्री रुक्मिणी मातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे. देणगीतून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रुपये , बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाच्या विक्रीतून एकूण ७२ लाख ४६ हजार २१० रुपये समितीस मिळाले. मंदिर समितीने नव्याने बांधलेल्या भक्त निवासाचा लाभ यंदा भाविकांना झाला. हजारो भाविकांची तिथे राहण्याची उत्तम सोय झाली. या नवीन बांधण्यात आलेल्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाच्या माध्यमातून १८  लाख ९१ हजार रुपये यंदा समितीला मिळाले. याशिवाय वेदांत आणि व्हिडिओकॉन भक्त निवास च्या माध्यमातून ३ लाख ५० हजार ४०० रुपयांचे उत्पन्न समितीला मिळाले आहे.

मागील वर्षीच्या आषाढी यात्रेत मंदिर समिती ती ला विविध माध्यमातून एकूण सुमारे २ कोटी ९० लाख रुपये मिळाले होते.आषाढी यात्रा काळात मंदिर समिती व प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.देणगी जमा करणे पाणी वाटप करणे वैद्यकीय सेवा देणे स्वच्छता करणे आदी कामे करण्यासाठी  गोपाळपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांकडे सुमारे तीन हजार स्वयंसेवकांनी यात्राकाळात सेवा दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase of the donation amount of one and a half crore to the offerings made to Lord Viththal