
मागील वर्षीच्या तुलनेत 78 हजार किलोमीटरमध्ये घट करून नगर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत पाच लाख 88 हजारांनी उत्पन्नात वाढ केली आहे.
नगर : कमी किलोमीटरमध्ये जास्त उत्पन्न मिळविण्याची किमया एसटीच्या नगर विभागाने केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवाळी सणानिमित्त जादा बसचे सुयोग्य नियोजन केल्यामुळेच विभागाने भारमान, उत्पन्न व कमी किलोमीटर, अशा सर्वच क्षेत्रांत आघाडी मिळविली आहे.
दिवाळी सणानिमित्त गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने एसटी बसला मोठी गर्दी होते. नेहमीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातर्फे जादा बस सोडण्यात आल्या होत्या. पंढरपूर यात्रेप्रमाणेच जादा बस सोडण्याचे नियोजन विभागनियंत्रक विजय गिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
अवश्य वाचा ः "शिवशाही' बरोबर साध्या बसचाही पर्याय
नियाेजनाचा फायदा
कमी किलोमीटरमध्ये जादा उत्पन्न मिळविण्यासाठी नगर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी नियोजन करीत होते. त्याचे फळ नगर विभागाला मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत 78 हजार किलोमीटरमध्ये घट करून नगर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत पाच लाख 88 हजारांनी उत्पन्नात वाढ केली आहे. तसेच, मागील वर्षीच्या तुलनेत भारमानात वाढ झाली आहे. मागील वर्षी 59.24 एवढे भारमान होते. त्यात यंदा वाढ होऊन ते 61.84 झाले आहे.
हेही वाचा ः यष्टी पेटली पळा पळा...
किलाेमीटर घटले उत्पन्न वाढले
मागील वर्षी चार ते 16 नोव्हेंबर 2018 या कालावधीत जादा बसच्या माध्यमातून, 31 लाख 78 हजार किलोमीटर अंतरापर्यंत फेऱ्या करून 11 कोटी 57 लाख 47 हजार रुपयांचे उत्पन्न एसटीने मिळविले होते. तेवढ्याच किलोमीटरमध्ये जादा उत्पन्न मिळविण्याची किमया यंदा नगर विभागाने साधली आहे. 24 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत जादा बसच्या माध्यमातून 31 लाख एक हजार किलोमीटर फेऱ्या करून, 11 कोटी 63 लाख 35 हजारांचे उत्पन्न नगर विभागाने मिळविले.
या मार्गावर धावल्या जादा बस
दिवाळी सणानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नाशिक, बीड आदी भागांत जादा बस सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये पुणे, मुंबई व कल्याणसाठी मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या होत्या.
सर्वांच्याच मेहनतीमुळे उत्पन्नात वाढ
दिवाळी सणानिमित्त महिलांची गैरसोय होणार नाही याचे नियोजन केले. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्यामुळेच कमी किलोमीटरमध्ये नगर विभागाने जादा उत्पन्न मिळविले.
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर