माथाडी कामगारांना प्रतिटन २४ रुपये मजुरीवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

इचलकरंजी - वाहनांमध्ये सूत व कापडाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांना प्रतिटन २४ रुपये मजुरीवाढ देण्याच्या आणि ऑगस्टपासूनचा मजुरीतील फरक माथाडी कामगार कल्याण मंडळाकडे भरण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे कामगार संघटनेने दोन आठवड्यांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन मागे घेतले.

सूत व कापडाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांची मजुरीवाढ प्रत्येक तीन वर्षांनी होते. जुलै २००८ मध्ये त्रैवार्षिक कराराची मुदत संपली होती. त्यामुळे ऑगस्ट २०१८ पासून मजुरीवाढ मिळावी यासाठी संघटनेने मागणी केली. दोन महिने बैठका होऊनही निर्णय झाला नसल्याने ऑक्‍टोबरच्या सुरवातीला कामगार संघटनेने काम बंद आंदोलन केले.

दृष्टिक्षेपात

  •     आमदार हाळवणकरांची मध्यस्थी
  •     कामगार आयुक्तांचा तोडगा
  •     ऑगस्टपासूनचा फरक मिळणार
  •     फरक कामगार कल्याणकडे
  •     काम बंद आंदोलन मागे
  •     त्रैवार्षिक कराराची मागणी

याविषयी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वाहतूकदार व कामगार संघटनेत मजुरीवाढीबाबत एकवाक्‍यता न झाल्यास हा निर्णय सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी घ्यावा, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी जाहीर केले होते.
सहायक कामगार आयुक्तांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्रतिटन २४ रुपये मजुरीवाढ देण्याचा निर्णय घेतला; मात्र हा निर्णय मान्य नसल्याचे सांगून वाहतूकदार संस्थांनी पूर्वीच्याच मजुरीवर सूत व कापडाची चढ-उतार सुरू ठेवली होती.

वारंवार मागणी करूनही मजुरीवाढ होत नाही म्हणून १० डिसेंबरपासून संघटनेने पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले. अनेक बैठका झाल्या; मात्र निर्णय झाला नाही. अखेर आमदार हाळवणकर यांनी सहायक आयुक्त गुरव यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. आज आयुक्त कार्यालयात गुरव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत कामगार संघटनेचे शामराव कुलकर्णी, यशवंत लाखे, धोंडिराम जावळे व वाहतूकदार संघटनेचे रामचंद्र जगताप, बाबूराव पाटील, जितेंद्र जानवेकर उपस्थित होते.

Web Title: increase in Labor cost by 24 Rs