Independence Day : स्वातंत्र्य मिळविले; पण टिकवायचे कोणी?

सुधाकर काशीद
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - स्वातंत्र्य कमवायला खूप ज्ञात-अज्ञात माणसं झटली. त्यांनी त्यांचं सर्वस्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहिलं. मी देखील त्यात खारीचा वाटा उचलला; पण आज जे चाललंय ते बघितलं, की सुन्न होऊन जातं. कधी कधी असं वाटतं, की आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी पुन्हा चळवळ सुरू करावी...

कोल्हापूर - स्वातंत्र्य कमवायला खूप ज्ञात-अज्ञात माणसं झटली. त्यांनी त्यांचं सर्वस्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहिलं. मी देखील त्यात खारीचा वाटा उचलला; पण आज जे चाललंय ते बघितलं, की सुन्न होऊन जातं. कधी कधी असं वाटतं, की आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी पुन्हा चळवळ सुरू करावी...

हौसाताई भगवानराव पाटील (वय ९३) तळमळीने बोलत होत्या. या हौसाताई म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. केवळ कन्या नव्हे तर १९४२ च्या चळवळीत चक्क आपल्या बापाच्या हातात हात घालून सशस्त्र चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीची धग क्षणाक्षणाला अनुभवलेल्या. ज्या वेळी खेळण्या बागडण्याचे वय त्या वेळी हौसाताई स्वातंत्र्य चळवळीचे क्षण अनुभवू लागल्या.

आताच्या तरुण पोरांना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहीत नाही, ज्यांना माहीत आहे त्यांनीही तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवलेला नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची किंमतच कोणाला नाही आणि एकूण भ्रष्टाचार, झुंडशाही, जातीयवाद, धर्मवाद पाहता स्वातंत्र्य कमावलं खरं; पण गमावलं जाण्याची अधिक भीती आहे.
- हौसाताई पाटील

वडील नाना पाटील एके दिवशी नेहमीप्रमाणे घरी आले, ते त्या वेळी तलाठी होते. घरात आल्या आल्या त्यांनी तलाठ्याची नोकरी आपण सोडत असल्याचे सांगून स्वातंत्र्य चळवळीत सहभागाची प्रतिज्ञा केली आणि ते घराबाहेरही पडले. एक तलाठीच स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्या वेळेपासून नाना पाटील विरुद्ध ब्रिटिश सरकार, असा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. छोट्या हौसाताईला यातले नेमके काय, हे कळत नव्हते; पण ही छोटी हौसा नजरेने सगळं टिपत होती. सरकारने नाना पाटील यांना अटक करण्यासाठी घराला सील केले. जमीन जप्त केली आणि या आघाताने नाना पाटलांची पत्नी म्हणजेच हौसाताईंची आई मरण पावली. 
आणि हौसाताई मामाकडे राहू लागल्या.

नाना पाटलांची चळवळ जोमात इतकी होती, की नाना पाटलांचे नाव काढले तरी त्यांच्यासमोर एकटे यायला ब्रिटिश अधिकाऱ्यांची हिम्मत होत नव्हती. आपल्या बापाची ही चळवळ हौसाताई पहात होत्या. रात्री-अपरात्री घरावर पोलिसांची धाड पडे, त्या वेळी हौसाताई पोलिसांना धैर्याने सामोरे जात. 
एवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर त्या वडिलांच्या सशस्त्र चळवळीत सहभागी झाल्या.

क्रांतिकारकांना जेवण पुरवणे, काडतुसे, पिस्तुले इकडून-तिकडे पोहोचवणे, महत्त्वाचे निरोप रात्री-अपरात्री एकमेकाला देणे, भवानीनगर रेल्वे स्टेशनवरून पोलिसांच्या बंदुकी पळवणे, या कामात त्या सक्रिय राहिल्या. भूमिगत राहून ब्रिटिशांविरुद्ध वाघासारखे लढणाऱ्या आपल्या बापासाठी जीवाचं रान करू लागल्या. ‘दिसले की गोळी घाला’ असा आदेश ज्या नाना पाटलांसाठी सरकारने दिला होता. त्यामुळे नाना पाटील भूमिगत राहून चळवळ चालवत होते. सरकारला जेरीस आणत होते. अशा वेळी बापासोबत निधड्या छातीने हौसाताई लढत होत्या. रोज वेगवेगळे चटके अनुभवत होत्या. हे अनुभवता अनुभवता स्वातंत्र्य चळवळीच्या वाटचालीचा त्या खणखणीत साक्षीदारच बनून गेल्या. 

आज हौसाताईंचे वय ९३ आहे. पती माजी आमदार भगवानराव पाटील यांचे निधन झाले आहे. आता मुलगा ॲड. सुभाषराव पाटील, प्रा. विलासराव पाटील यांच्यासोबत कुटुंबात आहेत. वय ९३ असले तरीही बऱ्यापैकी खणखणीत आहेत. स्वातंत्र्य चळवळीचे ते दिवस आजही डोळ्यासमोर आहेत; पण एक खंत कायम त्यांच्यासोबत आहे. स्वातंत्र्य मिळवले खरे; पण देशात जे काही एकूण चाललंय ते पाहून खरंच हे स्वातंत्र्य टिकणार का, हा त्यांच्या मनात सदैव खदखदणारा प्रश्‍न आहे.

Web Title: Independence day special Nana Patil Girl Housatai interview