Independence Day : कारगिल युद्धात लढलेला कोल्हापूरचा योद्धा

नंदिनी नरेवाडी
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

एकीकडे शत्रूचे आक्रमण परतावून लावायचे. तेही पूर्ण बर्फाळ प्रदेशात की जेथे जीवन-मरणाचा प्रश्‍न गंभीर बनलेला. निसर्गाचे आव्हान पेलत शत्रूशी निकराची दिलेली झुंज आजही त्यांना लढण्याची ऊर्जा देते, अशी भावना १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात सियाचीनमध्ये सहभागी झालेले कोल्हापुरातील वीर शिवकुमार सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

कोल्हापूर - देश संरक्षण सेवा बजावताना तेथील परिस्थितीच अशी की, अंघोळ, दाढी करायची नाही. शिवाय तोंडावर पाणी जरी मारले तरी काही क्षणात त्याचा बर्फ होणार. श्‍वासोच्छ्‌वास घेता येत नाही. असे जीवघेणे नैसर्गिक संकट तर दुसऱ्या बाजूला शत्रूच्या हल्ल्याला तोंड देत दोन्ही आघाडीवर युद्ध करीत विजय खेचून आणला. तीन महिने त्या परिस्थितीत त्यांनी शत्रूला आक्रमकपणे धैर्याने तोंड दिले.

एकीकडे शत्रूचे आक्रमण परतावून लावायचे. तेही पूर्ण बर्फाळ प्रदेशात की जेथे जीवन-मरणाचा प्रश्‍न गंभीर बनलेला. निसर्गाचे आव्हान पेलत शत्रूशी निकराची दिलेली झुंज आजही त्यांना लढण्याची ऊर्जा देते, अशी भावना १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात सियाचीनमध्ये सहभागी झालेले कोल्हापुरातील वीर शिवकुमार सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

नोकरी करायची तर फक्त सैन्य दलातच, अशी जिद्द घेऊन मंगळवार पेठेतील शिवकुमार सावंत सैन्य दलात दाखल झाले. कारगील युद्धात त्यांनी उत्तुंग कामगिरी बजावली, त्याच्या आठवणी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जागविल्या. मंगळवार पेठेतील प्रॅक्‍टीस क्‍लबचे ते खेळाडू. वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यात भरती झाले. १९९९ साली झालेल्या कारगील युद्धात ‘मेघदूत मोहिमेत’ ते सहभागी झाले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणाची बाजी लावून हल्ला परतवून लावला.

त्या मोहिमेदरम्यानची एक आठवण त्यांनी जागविली, ते सियाचीन ग्लेसर येथे मित्रासोबत ड्यूटी संपवून ते छावणीत आले. बूट काढल्यानंतर मित्राच्या पायाची बोटे थंडीमुळे अक्षरक्षः मोडली होती. तो प्रसंग आजही अंगावर काटा उभा करतो. २१ वर्षे देशाची सेवा करून हवालदार पदावरून निवृत्त झालेले सावंत तरुणांना मार्गदर्शन करू इच्छितात. मुलगा पृथ्वीराज व मुलगी सलोनी या दोघांनाही सैनिकी प्रशिक्षण शाळेत घातले आहे. 

कारगिल युद्धात कठीण प्रसंगात शत्रूला तोंड दिल्यानंतर ज्या वेळी विजयाचा क्षण आला, त्या वेळी डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. आजही तो प्रसंग तसाच डोळ्यांसमोर उभा राहतो. आणि त्या क्षणी मी त्या तुकडीचा भाग होतो, याचा जास्त अभिमान वाटतो. 
- शिवकुमार सावंत,
निवृत्त हवालदार

Web Title: Independence Day vir Shivkumar Sawant victory story