शेतकऱ्यांना मिळणार ‘ॲप’द्वारे ऊस बिलाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

ऊस बिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी ॲप तयार केले आहे. त्याची पुण्यातील कार्यालयात आजच चाचणी घेतली आहे. काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्रुटी दूर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत ‘ॲप’चे काम सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. 
- शेखर गायकवाड,
साखर आयुक्त, पुणे

कोल्हापूर - आपल्या उसाला किती दर जाहीर झाला, एफआरपीनुसार ज्या-त्या साखर कारखान्यांची रक्कम किती होते, प्रत्यक्ष हाती उसाचे किती रुपये मिळाले, ते कोठे जमा झाले, याची इत्थंभूत माहिती ‘ॲप’द्वारे उपलब्ध होणार आहे.

साखर आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडे सभासद आणि ऊस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांची ही माहिती या मोबाईल ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्याऐवजी घरबसल्या माहिती मिळेल.

राज्यात सहकारी आणि खासगी सुमारे १८४ साखर कारखाने सध्या सुरू आहेत. या सर्व कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांना आपला ऊस किती गाळप झाला, बिल किती मिळाले, कारखान्याकडे किती रुपये थकीत आहेत, याची माहिती घेण्यासाठी संबंधित कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जावे लागते. याशिवाय, उत्पादकांनी गावपातळीवर सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेडही थेट बिलातूनच केली जाते. अनेकदा शेतकऱ्यांना बॅंकेत किती रुपये जमा झाले आणि सेवा संस्थेने किती कपात केली, याचा हिशेब लागत नाही. त्यामुळे शेतकरी गोंधळून जातात. 

दरम्यान, साखर आयुक्त कार्यालय आणत असलेल्या ‘ॲप’मुळे ही सर्व माहिती शेतकऱ्यांना एका क्‍लिकवर घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हेलपाटे कमी होतील. ॲपमध्ये शेतकऱ्यांना बिल पाहण्यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांक किंवा सभासद क्रमांक टाकावा लागणार आहे.

ऊस बिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी ॲप तयार केले आहे. त्याची पुण्यातील कार्यालयात आजच चाचणी घेतली आहे. काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्रुटी दूर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत ‘ॲप’चे काम सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. 
- शेखर गायकवाड,

साखर आयुक्त, पुणे

शेतकऱ्यांचा किती टन ऊस कारखान्याकडे आला, याची माहिती मोबाईल एसएमएसद्वारे कळते. अनेकदा कोणत्या तारखेला किती ऊस गेला, बिलापैकी सेवा संस्थांनी किती कपात केली आणि बॅंकेत किती पाठवले, याचा ताळमेळ लागत नाही. ‘ॲप’मुळे सर्व माहिती एका दमात मिळणार असेल तर ते सोईचे होईल. 
- विजय पाटील,

ऊस उत्पादक शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about sugarcane bill on mobile app