
मिरज इतिहास मंडळाचे संशोधन; बिज्जल कलचुरीचा दानलेखाचा उल्लेख
मिरज (सांगली) : चालुक्यकालीन तिसरा सोमेश्वर ऊर्फ भूलोकमल्ल राजाच्या कारकीर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख बालगाव (ता. जत) येथे मिळाला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधलेला हा शिलालेख सन ११३७ मधील म्हणजे सुमारे ८८४ वर्षांपूर्वीचा आहे. बिज्जल कलचुरीचा कालदृष्ट्या सापडलेला हा जिल्ह्यातील पहिला शिलालेख असून, यात बालगाव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचा उल्लेख आहे. या संशोधनामुळे सांगली जिह्यातील तत्कालीन राजकीय, धार्मिक, इतिहास समजण्यास मदत होणार आहे.
बालगाव हे पंढरपूर-विजापूर महामार्गावर कर्नाटक सीमेवरील सांगली जिह्याचे शेवटचे गांव आहे. येथे आल्लमप्रभुचे प्रसिद्ध देवस्थान आहे. याच देवस्थानाशेजारी हळेकन्नड लिपितील हा शिलालेख भग्नावस्थेत मिळाला. त्याच्या वरच्या भागातील केवळ १३ ओळीच शिल्लक आहेत. या शिलालेखावर सुर्य, चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार अशी चिन्हे कोरली आहेत.
हेही वाचा- लय भारी : सांगलीत १८ गावांत महिलाराज; २७ महिलांना थेट कामाची संधी
बालगांवमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरी राजाने सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखाच्या प्रारंभी कलचुरी राजा बिज्जल याच्या बिरुदावल्या आहेत. बिज्जल कलचुरी हा चालुक्यराजा दुसरा जगदेकमल्ल आणि भूलोकमल्ल याचा तो मांडलिक होता. त्याला पंचमहाशब्दांसह शंख, भेरी, मृदंग, श्रृंग, घंटा ही वाद्ये वाजविण्याचा सन्मान मिळाला होता.
हेही वाचा-चार हजारांवर शेतकऱ्यांना फटका; अनुदान बंदच
बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६ मध्ये चालुक्याचे मांडलिकत्त्व झुगारुन देऊन सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर येथे सत्ता प्रस्थापित केली. यामध्ये सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिह्याच्या विविध भागात त्याचे शिलालेख मिळत आहेत. देशिंग-बोरगांव,भाळवणी, वळसंग याठिकाणी हे शिलालेख मिळाले आहेत. शिलालेखाच्या अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव), मधू पाटील (बालगाव) यांची मदत झाली.
संपादन- अर्चना बनगे