Success Story : ऊसतोडणी कामगार झाला पोलीस! दिनकर बेलदरच्या जिद्दीची कथा; वेटर, हमाल म्हणून केली कामे

सलग आठ वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शनिवारी (ता. २९) लागलेल्या निकालात राज्य राखीव पोलीस दलात भरती झालेला दिनकर दगडू बेलदर याची निवड
inspiring story of sugarcane worker dinkar dagadu beldar  becoming police
inspiring story of sugarcane worker dinkar dagadu beldar becoming police Sakal

इस्लामपूर : सलग आठ वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शनिवारी (ता. २९) लागलेल्या निकालात राज्य राखीव पोलीस दलात भरती झालेला दिनकर दगडू बेलदर याची निवड जिद्दीच्या संघर्षाची कथा बनली आहे.

हॉटेलात वेटर, हंगामात ऊसतोडणी कामगार, कारखान्यात मळी भरणारा कामगार आणि दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करणारा दिनकर आता पोलीस झाला आहे. दगडू धनाजी बेलदर (वय ७८) आणि सीताबाई दगडू बेलदर (वय ६५) हे मूळचे बीड जिल्ह्यातील.

त्यांचा दिनकर हा मुलगा गेली आठ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. प्रारंभी त्याने इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी खटपट केली. तीन वेळा परीक्षा दिल्या. वयाची मर्यादा संपल्याने त्याने आर्मीचा नाद सोडून दिला;

परंतु नंतर काहीही झाले तरी पोलीस भरती होणारच ही जिद्द मनात ठेवून २०१७ पासून त्याने पुन्हा तयारी सुरू केली. कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत दोन वर्षे वाया गेली आणि पाचव्या प्रयत्नात त्याने राज्य राखीव पोलीस दलात भरती होण्यात यश मिळवले आहे. अहमदनगर कुसळगाव गट क्रमांक १९ मध्ये त्याला हे यश मिळाले.

बीड जिल्ह्यातील हटकरवाडी नावाच्या अत्यंत छोट्याशा गावातून दिनकर इस्लामपूरला आला. आई-वडील ऊस तोडणी कामगार असल्याने राजारामबापू साखर कारखाना युनिट कार्यस्थळावर इकडे यावे लागले.

दिनकरला दोन भाऊ आणि बहीण आहे. हे सगळे ऊसतोड मजूर आणि हमाल म्हणून काम करतात. काही वर्षांपूर्वी वडील पाय घसरून पडले. त्यानंतर त्यांनी कामावर जाणे थांबवले. गावाकडे जमीन असली तरी पाणी नाही, त्यामुळे शेती निरुपयोगी.

आईने पूर्वी ऊसतोडणी मजुराचे काम केल्याने सध्या वयामुळे जमेल तसे शेतातील कामे करत असते. या सगळ्या वाटचालीत दिनकर कधी आश्रमशाळेत तर कधी कासेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत राहिला. पदवीचे शिक्षणासाठी त्याने बीड जिल्ह्यात प्रवेश घेतला. नंतर ऊसतोडणीचे काम करत राहिला.

फक्त परीक्षा देऊन त्याने पदवी मिळवली. त्या दोन वर्षात त्याने ऊसतोडणीबरोबरच ऊस तोडणीच्या हंगामाव्यतिरिक्त इस्लामपुरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. एका हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून काम केले.

इथे तो संबंधित डॉक्टरांच्या मोठ्या गाड्या धुणे, पुसणे, घरात लागणारा किराणा, भाजीपाला आणून देणे अशी कामे करत होता. त्यानंतर एका दुध संघात त्यांनी दुधाचे कॅन उतरवणे, ओतणे, धुणे अशी कामेही केली. वाटेगाव मधील कारखान्यात ट्रॅक्टरमध्ये मळी भरण्याचेही काम त्याने केले.

याशिवाय अंगणवाड्यांना पुरवली जाणारी जी सुकडी असते, ती सुकडी गावोगावी जाऊन उतरवण्याची हमालीची कामेही केली. आर्मी भरतीचा प्रयत्न फसला म्हणून काय झाले? आपण वर्दी मिळवायचीच! ही जिद्द त्याने जपली.

पाचवीला पुजलेले दारिद्र्य, गरीबी याला एकमेव पर्याय हाच आहे, हे त्याने जाणले होते. अन्यथा आपल्यालाही ऊसतोडणी आणि हमालीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाटेल तो त्रास सोसून त्याने जवळपास आठ वर्षे पोलीस भरतीचा अभ्यास केला.

इस्लामपूरमधील रवी बावडेकर यांच्या हर्ष अकॅडमीत प्रवेश घेतला. श्री. बावडेकर यांच्याविषयी दिनकर म्हणतो, "फक्त पुस्तकी ज्ञान कोणत्याही अकॅडमीत मिळेल; पण दारिद्र्याची चटके सोसत असताना वारंवार येणाऱ्या नैराश्याच्या लाटेवर कशी मात करायची यासंदर्भात बावडेकर सरांनी मला सतत सकारात्मक ऊर्जा दिली.

व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यास सांगितले. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. पहिलीत असताना १ अंक लिहिता येत नव्हता म्हणून मला दोन वेळा आईबापाने पहिलीतच बसवले होते. अभ्यासाच्या निमित्ताने मी गेली काही गावाबाहेर आहे.

गावात कालपर्यंत माझ्यावर 'केव्हा पोलीस भरती होणार?' म्हणून टीका होत होती; पण काल रात्री निकाल आल्यापासून गावचे लोक जल्लोष करत आहेत. ज्या वडिलांना ऐकायलाही येत नाही आणि डोळ्यांना फारसे दिसत नाही त्यांच्यावर मात्र कौतुकाचा वर्षाव होत आहे."

२०२२-२३ या दोन वर्षात दिनकरने भरतीवर पूर्ण लक्ष एकाग्र केले. बाहेरची काम करून भरतीचा अभ्यास करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. बावडेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळे थांबवले. पूर्ण लक्ष भरतीवर दिले. त्याचाच फायदा त्याला कालच्या निकालात झाला आहे.

३ वर्षे गावाकडे गेलो नाही!

'नुसताच अभ्यास करतोयस असे सांगतोयस, मग पास का होत नाहीस?' असे गावाकडचे लोक नावं ठेवू लागले होते. तेव्हापासून गेली ३ वर्षे गावाकडे जाणे बंद केले. आता अभिमानाने जाईन, असे दिनकरने सकाळशी बोलताना सांगितले. 'वडिलांची आठवण यायची, पण मोबाईलमध्ये त्यांचा एक फोटो होता, तो पाहूनच मनाचे समाधान करून घ्यायचो' असेही तो म्हणाला.

"या दोन वर्षात कामाला जाण्याऐवजी अभ्यासावर लक्ष दिले म्हणून मी पास झालो. पण माझ्यावर ८० हजार रुपयांचे कर्ज आहे. मला आता प्राधान्याने ते फेडायचे आहे. मला माझ्या परिस्थितीची जाणीव आहे. माझ्या हलाखीच्या, अडचणीच्या काळात माझ्यासोबत राहिलेल्या प्रत्येकाचे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवीन; पण माझ्यासारखी वाईट वेळ कोणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मी नेहमी करत राहीन."

- दिनकर दगडू बेलदर

"गेल्या महिनाभरात लागलेल्या निकालात ६४ विद्यार्थी पोलिसात भरती झालेत. या सर्वांमध्ये दिनकर बेलदर या विद्यार्थ्याकडे माझेच नव्हे, तर त्याच्या मित्रांचेही लक्ष होते. एकवेळ आपण भरती झालो नाही तरी चालेल; पण दिनकर झाला पाहिजे, अशी या मुलांची धारणा होती. त्याची धडपड, मेहनत मी पाहिली आहे. दिनकरच्या निकालाने माझ्या डोळ्यांत पाणी आले."

- रवी बावडेकर संचालक, हर्ष अकॅडमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com